मृणालिनी फडणवीस यांनी घेतला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:58 PM2018-05-07T18:58:19+5:302018-05-07T18:58:19+5:30
नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली,
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे माझे ध्येय असून, संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठाचे नाव सदोदित उंचावण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारताना व्यक्त केले.
नूतन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी. पी. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बालाजी शेवाळे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, शैक्षणिक संकुलांचे संचालक आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची धुरा सांभाळण्याची संधी मला लाभली, याचा मला मनापासून आनंद वाटतो. सोलापूर विद्यापीठ परीक्षाविषयक कामकाजात आघाडीवर आहे. यापुढच्या काळात या विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रामुख्याने पदवी स्तरापासून विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे विशेष लक्ष द्यावे, यावर माझा कटाक्ष असणार आहे. विद्यापीठातील सर्व विभागांना भेटी देऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्या अडचणी सोडविणे याकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुसाकडून मिळणाºया निधीचा चांगला उपयोग करून विद्यापीठाच्या सर्वच संकुलांच्या विकासाला गती देणे, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे, नॅकद्वारे विद्यापीठास अ दर्जा मिळविणे आदी आपले संकल्प असल्याचेही कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या.
याप्रसंगी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, जवळपास पाच महिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नियमित कार्यभार सांभाळण्याबरोबरच पाच महिन्यांसाठी सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची संधी मला मिळाली. सोलापूर विद्यापीठ आणि आमच्या विद्यापीठात सामंजस्य करार केलेला आहे, याद्वारे या दोन विद्यापीठांचे परस्पर सहकार्य आणखी वाढावे. या विद्यापीठाची काही कामे मार्गी लावता आली, याचे समाधान आहे, राहिलेली कामे नव्या कुलगुरू समर्थपणे तडीस लावतील, असा विश्वास मला वाटतो. विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा त्यांना रोजगाराची संधी मिळेल अशाप्रकारचे अभ्यासक्रम असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.