थकबाकीअभावी महावितरणने तोडली मंगळवेढा तहसीलची वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 05:24 PM2017-08-31T17:24:19+5:302017-08-31T17:25:15+5:30
मंगळवेढा दि ३१ : मंगळवेढा तहसील कार्यालयाने महावितरणचे बिल न भरल्याने महावितरणच्या अधिकाºयांनी तहसील कार्यालयाची वीज तोडून झटका दिला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
मंगळवेढा दि ३१ : मंगळवेढा तहसील कार्यालयाने महावितरणचे बिल न भरल्याने महावितरणच्या अधिकाºयांनी तहसील कार्यालयाची वीज तोडून झटका दिला आहे. यामुळे तहसील कार्यालय तीन दिवसांपासून अंधारात होते. येत्या सोमवारी वीज बिल भरण्याच्या लेखी आश्वासनानंतर बुधवारी दुपारी वीज जोडण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी दिली.
मंगळवेढा तहसील कार्यालयाकडे महावितरणचे १ लाख २० हजारांचे वीज बिल थकीत होते. वारंवार नोटिसा देऊनही तहसील कार्यालयाने वीज बिल भरण्यास टाळाटाळ केल्याने अखेर महावितरणने कनेक्शनला कात्री लावल्यानंतर दोन दिवसानंतर पाच दिवसांचा अवधी मागत सोमवारी वीज बिल भरण्याची तयारी तहसीलने दर्शविल्याने अखेर वीजपुरवठा जोडण्यात आला आहे.
मागील आठवड्यात तहसीलदार प्रदीप शेलार निलंबित झाल्यानंतर नायब तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. सध्या तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. विद्युत पुरवठा ठप्प केल्याने या कामकाजावर परिणाम झाला होता. निलंबित तहसीलदार शेलार यांनी त्यांच्या कार्यकाळातील ही थकबाकी असून त्यांनी ती वेळेत भरली असती तर तहसीलवर अंधारात राहण्याची नामुष्की आली नसती.
---------------------------
महावितरणचा दुसरा शॉक पोलीस ठाण्याला
मंगळवेढा शहरातील बहुतांशी शासकीय कार्यालयाच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. यामध्ये मंगळवेढा पोलीस ठाण्याची तब्बल ७६ हजारांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी वारंवार सूचना करूनही वीज बिल भरले नसून आता तहसीलनंतर पोलीस ठाण्याचा विद्युतपुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.
------------------------
वाढती थकबाकी, वीजगळती यामुळे डबघाईला येत असलेल्या महावितरणची गाडी रुळावर आणण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून वसुलीच्या सक्त सूचना प्राप्त झाल्या आहेत. कमी वसुली असणाºया तालुक्यातील अधिकाºयांना नोटिसा काढण्यात आल्या असून कारवाई करण्याचे संकेत दिल्याने वसुलीची मोहीम तीव्रपणे सुरु केली आहे. प्रत्येक थकबाकीदाराने आपले वीज बिल भरून वीजतोडणीची नामुष्की टाळावी.
- संजय शिंदे, उपकार्यकारी अभियंता, मंगळवेढा