पायाखाली चिखल, डोक्यावर खुर्ची; तीन तास पावसातही उत्साह दाटून !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:10 AM2019-09-02T05:10:23+5:302019-09-02T05:14:50+5:30
चार जिल्ह्यांतील कार्यकर्ते सभेला; सोलापूर, उस्मानाबाद, सातारा अन् कोल्हापूरच्या गाड्या धडकल्या मैदानावर
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा समारोपाच्या सभेस पार्क मैदानावर जमलेल्या भाजपचे कार्यकर्ते आणि सोलापूरकर श्रोत्यांना पावसाचा सामना करावा लागला. जोरदार वृष्टी होत असल्याने संपूर्ण मैदानावर चिखल निर्माण झाला. यास्थितीतही कार्यकर्ते मैदानातून हलले नाहीत. पावसाच्या बचावासाठी डोक्यावर खुर्ची घेऊन चिखल तुडवित ते मोठ्या उत्साहात उभे होते.
पावसाला सुरुवात झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तुळजापूरहून सोलापूरकडे मार्गस्थ झाली होती. सुमारे अर्धा पाऊण तास जोरदार पाऊस कोसळत होता. या स्थितीत मैदानावर गोंधळ उडेल, अशी भीती निर्माण झाली होती. पण सोलापूरकरांनी संयम पाळत जागेवरच थांबणे पसंत केले. पावसाची रिपरिप वाढल्यानंतर त्यांनी डोक्यावर खुर्ची धरण्यास सुरुवात केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा पाहण्यासाठी भर पावसात सोलापूरकरांनी गर्दी केली होती. काहींनी पाऊस पडत असताना मोबाईलवरुन फोटो व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत अमित शहा यांच्या ताफ्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. रस्त्यामधून कोणी येऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. होटगी रोड परिसरातील प्रत्येक चौकामध्ये पोलिसांची उपस्थिती होती. वाहनधारकांना दुसºया बाजूने जाण्याच्या सूचना यावेळी देण्यात येत होत्या.
पाऊस पडत असल्याने अमित शहा येणार नाहीत अशी चर्चा होती; मात्र त्यावेळेस इतका पोलीस बंदोबस्त लावला म्हणजे ते नक्की येतील अशी आशा काहींनी व्यक्त केली. अशातच ४:४० वाजता अमित शहा विमानतळावर आले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अमित शहा यांचे स्वागत केले.
ताफ्यामध्ये घुसली रिक्षा अमित शहा यांच्या ताफ्यामध्ये सुमारे २३ गाड्यांचा समावेश होता. ताफ्यातील पहिले वाहन विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर पोलिसांचे लक्ष हे रस्त्याकडे न राहता विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे असतानाच एक रिक्षा चालक प्रवाशांना घेऊन ताफ्याच्या मधोमध आला. रिक्षा घुसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अमित शहांनी थोपटली मुख्यमंत्र्यांची पाठ
मुख्यमंत्र्यांची यात्रा सोलापुरात पोहोचण्यापूर्वी सुमारे दीड तास अमित शहा सोलापुरात दाखल झाले होते. विमानतळावरून शासकीय विश्रामगृहात गेले. यात्रेची प्रतीक्षा करीत तेथेच थांबून राहिले. यात्रेने उळेगाव पार केल्यानंतर अमित शहा डाक बंगल्यातून जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात गेले. तेथे यात्रेच्या बसवर जाऊन उपस्थितांना अभिवादन केले आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर येताच त्यांच्या पाठीवर शहा यांनी थाप देऊन संपूर्ण यात्रेच्या प्रतिसादाबद्दल त्यांचे कौतुक केले.