‘मुदिता’अवस्थेत जगलेला व्रतस्थ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 04:18 PM2019-04-17T16:18:59+5:302019-04-17T16:20:24+5:30

रविंद्र देशमुख बौध्द तत्त्वज्ञानात ज्या चार मनोवस्था सांगितल्या आहेत. त्यामधील एक मुदिता...मुदिता म्हणजे दुसºयाच्या सुखात सुख मानणारा अर्थात सदैव ...

'Muddita', a restless reviewer living in a vacuum Go. Ma Pawar | ‘मुदिता’अवस्थेत जगलेला व्रतस्थ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

‘मुदिता’अवस्थेत जगलेला व्रतस्थ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

googlenewsNext
ठळक मुद्दे‘गोमा’ यांच्या आयुष्यभराच्या व्यासंगाचा, संशोधनाचा विषय म्हणजे अस्पृश्यता निवारण कार्याचे अग्रदूत समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य.महर्षी शिंदे यांच्या जीवनकर्तृत्वाच्या विविध पैलूंवर साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, मॅकमिलन अशा प्रकाशन संस्थांसाठी स्वतंत्र व संपादित स्वरूपाचे ९ ग्रंथ सिद्ध केले आहेत.

रविंद्र देशमुख

बौध्द तत्त्वज्ञानात ज्या चार मनोवस्था सांगितल्या आहेत. त्यामधील एक मुदिता...मुदिता म्हणजे दुसºयाच्या सुखात सुख मानणारा अर्थात सदैव आनंद राहणारा..डॉ. गो. मा. पवार यांनी जीवनभर याच अवस्थेत राहून साहित्य शारदेची सेवा केली. समाजसुधारक महर्षी  विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य जगापुढे मांडले.  मंगळवारची पहाट ‘गोमां’चा देह घेऊन गेली; पण त्यांची  आठवण अन्  त्यांनी सांभाळलेली मुदिता अवस्था प्रत्येकालाच प्रेरणा  देणारी ठरणार आहे.

सौंदर्यदृष्टी आणि आनंदीवृत्ती लाभलेले डॉ. गो. मा. पवार हे अगदी पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत सोलापूरच्या साहित्यक्षेत्र, सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. एप्रिल महिना उजाडला तसे त्यांचे प्रकृती स्वास्थ्य ढासळू लागले. थकवा जाणवायला लागला. २ एप्रिल रोजी त्यांना पक्षाघाताचा धक्का बसला. त्यानंतर लगेचच येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसादही देत होते; पण आज पहाटे अचानक त्यांची प्रकृती नाजूक झाली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. पवार यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, दोन भाऊ, एक बहीण, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी डॉ. पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव सुश्रुत यांचे निधन झाले होते.

डॉ. गो. मा. पवार यांचा जन्म १३ मे १९३२ रोजी बार्शी तालुक्यातील पानगाव येथे झाला. मोहोळ तालुक्यातील नरखेड हे त्यांचे मूळगाव. येथील हरिभाई देवकरण प्रशालेत उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठी विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी ‘विनोद: तत्त्व आणि बोध’ या विषयावर पीएच. डी. संपादन केली. आपल्या ३३ वर्षांच्या अध्यापनकाळात मराठी विषयाचा अधिव्याख्याता म्हणून १९५९ पासून ६८ पर्यंत अमरावती आणि औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर प्रपाठक म्हणून १९७९ पर्यंत मराठवाडा विद्यापीठात व १९८२ पर्यंतची अखेरची १३ वर्षे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतर सोलापूरला कायम वास्तव्यासाठी आले. येथील विजापूर रोडवरील भगवंत सोसायटीतील त्यांचा ‘मुदिता’ हा बंगला म्हणजे सरस्वतीचे जणू मंदिरच. देशभरातील विख्यात तेलुगू, मराठी, हिंदी साहित्यिकांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन साहित्यावर सखोल चिंतनात्मक चर्चा केली होती.

डॉ. गो. मा. पवार यांनी १९६३ पासून समीक्षात्मक लेखनास प्रारंभ केला. ‘कुसुमाग्रजांच्या रूपकात्मक कविता’ हा त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण लेख. त्यानंतर पु. ल. देशपांडे, आनंद यादव यांच्या लेखनाची त्यांनी समीक्षा केली. ‘विवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ हा त्यांचा पहिला ग्रंथ. व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक कथांची संपादने आणि त्यांच्या विवेचक प्रस्तावना लिहिल्या. ‘मराठी साहित्य: प्रेरणा आणि स्वरूप’ ‘विठ्ठल रामजी शिंदे यांच्या निवडक कथांचे संकलन’, भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेत ‘वि. रा. शिंदे चरित्र व कार्यविषयक पुस्तक’, ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रबंधाचे संपादन तसेच वि. रा. शिंदे यांची रोजनिशी (संपादन) ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण संपादने वाचकप्रिय ठरली.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचे संशोधन
‘गोमा’ यांच्या आयुष्यभराच्या व्यासंगाचा, संशोधनाचा विषय म्हणजे अस्पृश्यता निवारण कार्याचे अग्रदूत समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य. चाळीस वर्षे डॉ. पवारांनी या विषयाचे संशोधन केले. महर्षी शिंदे यांच्या जीवनकर्तृत्वाच्या विविध पैलूंवर साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, मॅकमिलन अशा प्रकाशन संस्थांसाठी स्वतंत्र व संपादित स्वरूपाचे ९ ग्रंथ सिद्ध केले आहेत.

महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी तर ते गेलेच. शिवाय, महर्षी शिंदे १९०१ ते १९०३ मध्ये आॅक्सफर्डला शिक्षणासाठी गेले म्हणून इंग्लंडमधील १७ शहरांत व पॅरिस, रोम, अ‍ॅमस्टरडॅम येथेही १९८३ साली जाऊन डॉ. पवारांनी महर्षी शिंदे यांच्यासंबंधी उपयुक्त स्वरूपाची माहिती मिळवली. या दीर्घकालीन व्यासंगाचे फलित म्हणजे डॉ. पवारांनी लिहिलेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (२००४) हा ६०० पृष्ठांचा बृहत् चरित्रग्रंथ. या ग्रंथास २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला असून हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, तमीळ या भाषांतून या ग्रंथाचा अनुवाद झाला आहे.

Web Title: 'Muddita', a restless reviewer living in a vacuum Go. Ma Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.