मुढवी गावात दहा दिवसांपासून लाईट नाही; पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 06:52 AM2020-10-22T06:52:56+5:302020-10-22T07:16:13+5:30
वंचित बहुजन आघाडीचा आरोप; चोवीस तासाच्या आत आम्हास माहिती का दिली नाही; प्रशासनाकडून आडमुठी भूमिका
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील मुढवी गावांमध्ये महापुराचे कारण देऊन महावितरणने दहा दिवसांपासून वीज पुरवठा बंद ठेवला आहे, गावात पिण्याच्या पाण्याबरोबरच वीज नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोबाईल चार्जिंग नाहीत अशा परिस्थितीमध्ये प्रशासन झालेल्या नुकसानीचे मोबाईल मध्ये फोटो काढून पाठवा,पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांची माहिती आम्हाला २४ तासाच्या आत का कळवली नाही असे म्हणून पंचनामे करण्यास टाळाटाळ करत असून या प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या भूमिकेने निसर्गाशी लढता-लढता आम्हाला प्रशासनानाशीही लढावे लागत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केली
परतीच्या पावसाने मंगळवेढा तालुक्यात दाणादाण उडवली असून झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी पूर्ण संपला आहे. त्यातच उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना अतिवृष्टी बरोबर या पुराच्या पाण्याचाही सामना करावा लागला, अशा परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्या बरोबरच जनावरे वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान होते, त्यामध्ये अनेकांची जनावरेही या पुरात वाहून गेली असून आठ दिवसानंतर प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मात्र या जनावरांचे पंचनामे करताना प्रशासनाकडून आम्हाला २४ तासात का कळविले नाही असे प्रश्न करून त्या जनावरांच्या पंचनाम्याची माहिती घेण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे हा प्रशासनाचा आडमुठेपणा दिसून येत असून त्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे प्रशासनाने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गेल्या दहा दिवसांपासून गावात लाईट नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची दखल लोकप्रतिनिधींनी तात्काळ घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना प्रशासनाला देणे गरजेचे असल्याचे प्रहार चे म्हणणे आहे.
एका बाजूला शेतकरी सामान्य जनता निसर्गाशी झुंजत असताना दुसऱ्या बाजूला आमचे पंचनामे करा म्हणून प्रशासनाशीही झुंजायला लावू नये एवढीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे तरी प्रशासनाने तात्काळ या जनतेला दिलासा देत नुकसान ग्रस्तांचे सर्व पंचनामे करणे गरजेचे असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांनी सांगितले.