पनवेलच्या बारबालेशी तिसरे लग्न करण्याच्या तयारीत होते मुजाहिद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:44 PM2019-12-24T12:44:45+5:302019-12-24T12:47:08+5:30
सोलापुरातील व्यापारी आत्महत्या प्रकरण : पनवेलच्या डान्सबारमध्ये झाली ओळख
सोलापूर : घनिष्ठ मित्रासमवेत मुंबईतील पनवेलमध्ये असलेल्या डान्सबारमध्ये गेल्यानंतर आडती व्यापारी मुजाहिद बागवान यांची बारबालेशी मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तिच्याशी तिसरे लग्न करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र बारबालेच्या त्रासाला कंटाळून मुजाहिद बागवान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे.
मुजाहिद बागवान हे आडती व्यापारी होते़ ते मुंबईला गेल्यानंतर घनिष्ठ मित्रासमवेत पनवेल येथील डान्सबारमध्ये गेले. मित्राने प्रेयसीच्या बहिणीशी मुजाहिद बागवान यांची ओळख करून देण्यात आली. कालांतराने बारबाला तानिया आणि मुजाहिद बागवान यांच्यात संपर्क वाढत गेला. नंतर मुजाहिद बागवान हे सातत्याने पनवेल येथील डान्सबारला जाऊ लागले.
दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले़ मुजाहिद हे वारंवार मुंबईला चालल्याने त्यांच्या वडिलांना संशय आला. वडिलांनी मुजाहिद याच्या मित्राशी संपर्क साधून माहिती घेतली, तेव्हा ते पनवेल येथील डान्सबारमध्ये जात असतो, असे सांगितले.
वडिलांनी पत्ता काढून संबंधित बारबालेस सोलापूरला बोलावून घेतले़ ती आल्यानंतर तिची आणि त्यांची ओळख झाली.
बारबाला तानिया नंतर सोलापूरलाही येऊ लागली होती. नंतर तानिया आणि मुजाहिद यांच्यात सातत्याने भांडणे होऊ लागली होती अशी माहिती प्रथमत: तपासात पुढे आली आहे़ अधिक तपास सुरू असल्याचे फौजदार रोहित दिवसे यांनी सांगितले़
धमकी दिल्याने मुजाहिद तणावात होते
- पनवेल येथे फ्लॅट घेण्यासाठी ५0 लाख रूपये दे आणि दोन्ही बायका सोडून माझ्याशी लग्न कर, असा आग्रह बारबालेने मुजाहिद बागवान यांच्याकडे धरला होता. पैसे दिले नाही तर आपल्या दोघांच्या संबंधाचे फोटो मी व्हायरल करून तुझी बदनामी करेन अशी धमकी बारबाला तानिया हिने दिली होती. सतत हा तगादा लावल्याने मुजाहिद बागवान हे तणावात आले होते. बारबालेच्या त्रासाला कंटाळूनच मुजाहिद बागवान याने आत्महत्या केली आहे अशी फिर्याद पत्नी नाझनीन बागवान यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे.
बारबाला बांगला देशातील रहिवासी
- पनवेल येथील डान्सबारमध्ये काम करणारी तानिया ही बांगला देशातील रहिवासी असल्याचे समजते. तिच्याशी संपर्क साधला असता, ती बांगला देशाची बॉर्डर क्रॉस करीत असल्याचे सांगत होती. तिचा तपास सुरू असून लवकरच तिला अटक केली जाईल अशी माहिती फौजदार रोहित दिवसे यांनी लोकमतशी बोलताना दिली.