मुुलांना हवीय संस्काराची गरज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:05 AM2019-08-31T11:05:43+5:302019-08-31T11:06:01+5:30
आज घराघरांतून केवळ वस्तू,वास्तू,पैसा,नोकरी, व्यवसाय यासाठी धावपळ चाललेली दिसते आहे.
आज घराघरांतून केवळ वस्तू,वास्तू,पैसा,नोकरी, व्यवसाय यासाठी धावपळ चाललेली दिसते आहे. यामध्ये मुलांना सारं पुरवताना कुठंतरी आमचे मूळ संस्कार आम्ही मोठी माणसं कमी पडताना दिसत आहोत. सायंकाळी देवापुढे निरांजनं लावून शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा अशी प्रार्थना विस्मरणात जात आहे. समाजात मोबाईल नावाचं विषारी खेळणं सर्वाहाती फिरत आहे. लहानांचं बाल्य, युवकांचं तारुण्य,वृद्धांची वार्धक्य अस्वस्थ करत आहे. यापासून सर्वांनी सावध रहावं.
विज्ञानाचा प्रत्येक शोध मर्यादेत वापरतो तोपर्यंत ते वरदान असते तर अतिरेकाने विनाश अटळ असतो. आज केवळ घरं मोठी झाली पण माणसांची मनं छोटी झाली. मुळांत जाण्याचं जाणतेपणंच सैरभैर होत आहे. मुलांना प्रेमळ संस्काराची गरज आहे. तुमचा वेळ हवा आहे. तुम्ही हवे आहात. माता, पिता गुरुजनांचा आदर राखता यावा यासाठी उत्तम विचार,वाचन व घराचं पावित्र्य ही राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजची मुलं खूप हुशार व कल्पक आहेत पण ती फार चंचल आहेत. ती दहा-वीस मिनिटेही शांत स्वस्थ बसू शकत नाहीत. हे वास्तव आहे यासाठी त्यांच्या मनावर उत्तम संस्काराचं बीजारोपण करावं लागेल.
आई-वडिलांना नमस्कार करण्याची सवय लावावी. मोठ्या माणसांशी बोलताना नम्रपणा अंगी असावा हा विचार रुजवावा लागेल. हे करु नको ते करु नको, हे खाऊ नये, हेच खा, हे करू नको, असं सांगण्यापेक्षा ते का व कशासाठी करावं किंवा करु नये ते थोडंसं विश्वासात घेऊन समजवावं लागेल. कारण अजूनही मुलं ऐकू शकतात.योग्यवेळी, योग्य पद्धतीने लक्ष दिले की बरेच अनर्थ टळू शकतात. घराचं वातावरण आनंदी, प्रसन्न व पवित्र ठेवावे. वैज्ञानिक दृष्टिकोन असणे वा बाळगणे म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणे नव्हे. शरीराच्या स्वच्छतेबरोबर मनाच्या नियमित स्वच्छतेचा संस्कारही करावा लागेल. पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणूनही जीवनभर जप हा संस्कार देणारी आई घराघरांतून जागृत व्हावी लागेल.
पैशाने हवे ते सुख मिळवू शकतो हे अर्धसत्य आहे. जीवनात संपूर्ण सुख हवं असेल तर उत्तम संस्कार असायलाच हवेत,तरंच मिळणाºया प्रत्येक सुख सुखाने उपभोगता येईल. मुलांना सारंच शिकवण्याची घाई करू नये. त्याला हळूहळू शिकू दे. वेगवेगळ्या क्लासेसला त्याला घालून दोघांचीही दमछाक करून घेण्यापेक्षा तोच वेळ त्यांच्याशी छान वागण्या, बोलण्या,खेळण्यासाठी देऊन पहा.त्याला फार आनंद वाटेल. त्याला खूप काही बोलायचं आहे. सांगायचं आहे. मग हसत खेळत अनेक चांगल्या सवयी, संस्कार त्यांच्यावर सहज करता येतील असं मला वाटतं.
लॉर्ड बेडन पॉवेल एकेठिकाणी फार छान म्हणतात. मला मुलांच्या भवितव्याची चिंता नाही तर तर त्यांना घडवणाºया व्यक्तीबाबत शंका आहे. कारण मन मानेल तसं मुलांशी वागून चालणार नाही. त्यांनाही, त्यांचा स्वाभिमान मन,जाणीवा, विचार, अस्तित्व आहे. आज पालकांनी विचारमंथन करण्याची गरज आहे. संस्कार वर्तनातून कसे करता येतील ते पहावे. कारण तेच चिरकाल टिकतील. जीवनातील समस्या हाताळण्याची हिम्मत त्याला यायलाच हवी. तो छान माणूस घडवायचा आहे तर मग संस्काराशिवाय कसं शक्य आहे ?
आपल्या राष्ट्राला गौरवशाली ऋषी मुनींच्या, विचारवंत, सामाजिक क्रांतिकारकांचा , शूरवीर पुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. हे सारे कुठंतरी काळवंडताना दिसत आहे. त्यावर फुंकर मारुन ते सारे दिव्य संस्कार पुन्हा एकदा आम्हाला मुलांच्या रोमारोमांत भरावे लागतील. त्या साºयाचा संस्कार मुलांवर करणे आज खूप गरजेचं आहे. समाजात संपूर्ण शांती समाधान हवे असेल तर प्रत्येकावर माणुसकीचा संस्कार व्हायला हवा. म्हणून घराघरांतून उत्तमोत्तम संस्कारसंपन्न बालक घडावे लागेल यासाठी संस्काराइतकं मोठं साधन दुसरं कोणतंही नाही.
- रवींद्र देशमुख
(लेखक जि. प. शाळेत शिक्षक आहेत.)