मुंबई-हैदराबाद बुलेट सोलापूरमार्गे जाणार; सोलापूर जिल्ह्यातील ६३ गावांमधील सर्वेक्षण होणार
By Appasaheb.patil | Published: July 12, 2021 01:18 PM2021-07-12T13:18:26+5:302021-07-12T13:18:45+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मुंबई-हैदराबाद हाय स्पीड रेल कॅरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेन प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. यासाठी आय.आय.एम.आर प्रायव्हेट लिमिटेड आणि लोकराज्य समाज विकास व संशोधन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील ६३ गावांचे या प्रास्तावित प्रकल्पामुळे होणाऱ्या सामाजिक परिणामाबाबतच्या सर्वेक्षणाची सुरुवात ११ जुलै २०२१ पासून होणार आहे.
या सर्वेक्षणाबाबतचे मूलभूत प्रशिक्षण भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालय सोलापूर येथे आय.आय.एम.आर. प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली संस्थेचे सत्यप्रकाश झा यांच्यावतीने लोकराज्य संस्थेच्या सर्वेक्षण टीमला देण्यात आले.
या सर्वेक्षणात लोकराज्य संस्थेचे सर्वेअर, सुपरवायझर व समन्वयक अशा २५ प्रशिक्षणार्थिंनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणात लोकराज्य संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, डॉ. सचिन घेरडे, सोलापूर जिल्हा समन्वयक डॉ. अपर्णा कांबळे, पुणे जिल्हा समन्वयक अमोल जोगदंडे, ठाणे व रायगड जिल्हा समन्वयक संदीप जाधव, प्रकल्प व्यवस्थापक मोईन शेख, सोलापूर निरीक्षक अजय हक्के, शाहबाझ पठाण, मोहसीन कत्तनळी यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणात भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य मेहता यांनी सहकार्य केले.
------–---–
या जिल्ह्यांसह राज्यांचा समावेश असणार
या प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, रायगड, ठाणे या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व आंध्र प्रदेशातील मेडक व रंगारेड्डी या जिल्ह्यांचा समावेश असून, लवकरच या जिल्ह्यांमधील सर्वेक्षण लोकराज्य संस्थेकडून पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातून या सर्वेक्षण कामाची सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष विजय जाधव यांनी दिली.
---------–-----------
सर्वे करण्यात येणाऱ्या गावांची संख्या तालुकानिहाय
- माळशिरस १३
- पंढरपूर १८
- मोहोळ १०
- उत्तर सोलापूर १२
- अक्कलकोट ०९