मुघल-ए-आझम सिनेमाच्या सोलापुरी पोस्टरची मुंबईलाही पडली होती भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:37 AM2020-08-10T11:37:44+5:302020-08-10T11:40:21+5:30
मुघल-ए-आझम प्रदर्शनाला ६० वर्षे पूर्ण; व्ही. शांताराम यांनी दिले होते आमंत्रण
राकेश कदम
सोलापूर : बॉलीवूडच्या इतिहासातील सोनेरी पान असलेल्या मुघल-ए-आझम सिनेमाच्या प्रदर्शनाला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली. सोलापुरातील चाहत्यांनी या सिनेमाचे जंगी स्वागत केले होते. सिनेमाच्या प्रिंट हत्तीवर ठेवून वाजत-गाजत मिरवणूक काढली होती.
या सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटे आजही चाहत्यांनी जपून ठेवली आहेत. देश बदलला; मात्र महान सम्राट अकबराच्या दरबारातील ही प्रेमगाथा आजही डंका वाजवित आहे. छाया मंदिरचे मालक भरत भागवत आणि मुघल-ए-आझमचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे सोशल स्कूलचे निवृत्त कलाशिक्षक मंजूर आलम यांनी किस्से ‘लोकमत’कडे शेअर केले.
भागवत टॉकीजमध्ये अनेक सिनेमे रिलीज झाले. मुघल-ए-आझमला जो सन्मान मिळाला तो आजपर्यंत इतर कोणत्याही सिनेमाला मिळाला नाही. या सिनेमाच्या प्रिंट मुंबईहून रेल्वेने सोलापुरात आल्या. स्वागतासाठी शेकडो चाहते हत्ती, बँड घेऊन रेल्वे स्टेशनवर जमले होते. त्यातील बहुतांश मुस्लीम होते. भागवत टॉकीजजवळ प्रिंट पोहोचल्या, त्यावेळी एका हिंदू माणसाकडून प्रिंटच्या पेटीची विधिवत पूजा करून घेण्यात आल्याची आठवण माझे वडील बाळासाहेब भागवत यांच्याकडून मी अनेकदा ऐकली. सोलापूरच्या यल्ला-दासी यांनी साकारलेले सिनेमाचे कलर पोस्टर हा तर देशभरात चर्चेचा विषय ठरला. मुंबईच्या प्लाझा थिएटरचे मालक शांताराम बापूंनी यल्ला-दासी यांना रातोरात मुंबईत बोलावून घेतले. तिथे यल्ला-दासी यांनी तयार केलेले पोस्टर पाहायला गर्दी व्हायची. रस्त्यावर अनेकदा ट्रॅफिक जाम व्हायचे. या सिनेमाने चित्रपटसृष्टीला आणि समाजाला कठोर परिश्रम आणि संवेदनेची जाणीव दिली आहे. आजही मला ही जाणीव महत्त्वाची वाटते.
हत्तीवरून व्हायचा प्रचार -मंजूर आलम
सोलापुरात त्यावेळी कमला सर्कस आली होती. या सर्कशीतील हत्तीवरून सिनेमाच्या प्रिंटची मिरवणूक निघाली. त्यानंतरही या सिनेमाच्या प्रचारासाठी सर्कशीतील हत्तींचा वापर करण्यात येत होता. हत्तीच्या पाठीवर सिनेमाचे पोस्टर लावलेले असायचे. पाठीवरच चित्रे काढलेली असायची. वातावरण निर्मितीसाठी सोबत भव्यदिव्य बँडपथकही होते. या सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीट आजही मी जपून ठेवले आहे, असे मंजूर आलम यांनी सांगितले.
असेही चाहते...
मंजूर आलम सांगतात, मला आजही ४ आॅगस्ट १९६० चा तो दिवस आठवतोय. मी आणि माझा मोठा भाऊ मुघल-ए-आझमच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीट बुक करायला सायंकाळी सात वाजता अंथरुण-पांघरुण घेऊन भागवत टॉकीजकडे गेलो होतो. चित्रमंदिरच्या खिडकीपासून लागलेली रांग वळसा घेऊन मीना टॉकीजपर्यंत आली होती. आम्ही मीना टॉकीजवळ रात्रभर पडून होतो. पहाटे उठलो तर रस्त्यावर चिक्कार गर्दी झाली होती. सिनेमावरील प्रेम पुन्हा कोणत्याही सिनेमाच्या निमित्ताने दिसले नाही.