मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 11:15 PM2018-10-11T23:15:18+5:302018-10-11T23:15:26+5:30
पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर : पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. नवरात्रात मुंबईतील गारबा आणि दांडियासाठी तिथे जाऊन टिपºया तयार करण्याचा आणि तो विकण्याचा अफलातून व्यवसाय या पारध्यांनी सुरू केला आहे.
मुंबईतील दादर, व्हीटी, डोंबिवली, भायखळा या भागामध्ये या पारधी कुटुंबांचा व्यवसाय सध्या जोर धरत आहे. फूटपाथलगत किंवा एखाद्या इमारतीच्या आश्रयाने राहून तिथेच टिप-या तयार करण्याचा उद्योग ते करीत आहेत. फूटपाथवर किंवा स्टेशनवर या टिपºया विकून त्यातून पैसा कमविणाºया या पारध्यांची धडपड लक्षवेधी ठरावी, अशीच आहे.
संग्रामनगरातील गौराबाई पवार, तिचा विवाहित मुलगा किसन पवार, सुरेश चव्हाण, दत्तू चव्हाण, बापू पवार, लाला चव्हाण, गोपाल पवार, अंबादास पवार आणि शिवा पवार या नऊ जणांचे कुटुंब गेल्या १५ दिवसांपासून गावातील घरांना कुलूप लावून मुंबईत राबत आहेत. हे कुटुंब मुंबईतील व्यापाºयाकडून ३०० ते ४०० रुपयात एक बंडल या भावाने बेलाच्या काठ्या विकत घेतात. चमकी, झिल्ली, पेस्ट खरेदी करून त्यापासून सुंदर टिपºया तयार करतात. नंतर त्यांची विक्री १० ते २० रुपये जोडी या भावाने करतात. या नऊ दिवसांच्या सीझनमध्ये एक कुटुंब २० ते २५ हजार रुपयांची कमाई करते. नवरात्र संपले की त्याच पैशातून मुंबईच्या ठोक बाजारातून फुगे, खेळणी खरेदी करायची आणि अकलूजमध्ये परत येऊन कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यांमध्ये किंवा यात्रांमध्ये त्याची चिल्लर विक्री करायची, असा त्यांचा व्यवसाय आहे. मागील १५ वर्षांपासून या कुटुंबाचा हा व्यवसाय सुरू आहे.
............................
मिरची, लिंबाचाही व्यापार
केवळ दांडिया विकण्याचाच नव्हे; तर मुंबईत जाऊन लिंबू, मिरच्या विकण्याचा व्यवसायही हे पारधी कुटुंब करतात. अकलूजच्या बाजारातून दर गुरुवारी लिंबू-मिरचीची खरेदी करायची. शुक्रवारी रेल्वेने मुंबई गाठायची. दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मुंबईच्या बाजारात त्याची विक्री करायची आणि त्याच रात्री किंवा सकाळी रेल्वेने परत यायचे. पुन्हा गुरुवारी तोच क्रम, अशी त्यांची व्यवसायाची पद्धत आहे. बेरोजगारीच्या नावाने सरकारला दोष देण्यापेक्षा किंवा कुणापुढे हात पसरण्यापेक्षा त्यांनी निवडलेला हा आत्मसन्मानाचा मार्ग कौतुकास्पद असाच आहे.