आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोलापूरात मुंडण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:57 PM2018-07-21T12:57:21+5:302018-07-21T12:58:50+5:30
सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्यावतीने जुना पुना नाका येथील संभाजीराजे चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले़
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करीत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी शहर पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे़ यावेळी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता़
मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाºया महाविद्यालयांनी मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले़
या मुंडन आंदोलनाप्रसंगी दिलीप कोल्हे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, विद्यार्थी सेनेचे महेश धाराशिवकर, नगरसेवक संतोष भोसले, संभाजी ब्रिग्रेडचे श्रीकांत घाडगे आदी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़