मुंडेंना कार्तिकीला पहिल्यांदा महापूजेचा मान
By Admin | Published: June 4, 2014 12:41 AM2014-06-04T00:41:15+5:302014-06-04T00:41:15+5:30
शासकीय पूजा; आषाढीप्रमाणे कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना मान
पंढरपूर: कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या, लेकुरवाळ्या विठ्ठलाची आषाढीला परंपरेप्रमाणे पूजा केली जायची. १९८५ साली विठ्ठल मंदिर राज्य शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आषाढीला शासकीय पहिली महापूजा केली होती. १९९५ साली युती शासनाच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कार्तिकीला महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा सुरू झाली आणि पहिल्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री या नात्याने मुंडे यांना मिळाला. वारकरी सांप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री वारीला फार मोठा मान आहे. या चारही वार्या चुकल्यानंतर राज्यासह परराज्यांतील भाविक महिना व पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरीला हजेरी लावून चंद्रभागा स्रान आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुनित होतात. पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या निर्मितीपासून प्रत्येक वारीला म्हणजे एकादशीला मान आहे. पूर्वी आषाढीला जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अनुपस्थितीत प्रांताधिकार्यांच्या हस्ते पूजा केली जायची. ते उपलब्ध नसल्यास मंत्री किंवा तत्सम अधिकारी पूजा करायचे. वारी ही वारकर्यांची असल्याने या परंपरेला छेद देण्यासाठी १९७२ साली अशा पूजेला विरोध झाला आणि शासकीय महापूजा बंद पडली. दरम्यान १९७२ साली राज्यात मोठा दुष्काळ पडल्यानंतर वारकर्यांमधून पूजा बंद केल्याने हा कोप झाल्याचा सूर निघाला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी पुढाकार घेत ही पूजा सुरू केली. दरम्यान १९८५ साली विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बडवे, उत्पातांचे अधिकार त्यांच्याकडेच ठेवत राज्य शासनाने ताब्यात घेतले. तेव्हा आषाढीला पहिली शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री या नात्याने वसंतदादा पाटील यांना मिळाला. ही परंपरा आजतागायत अखंडित सुरू आहे. १९९५ साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेना पुरस्कृत युतीची सत्ता आली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर आषाढीप्रमाणे कार्तिकीलाही शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून १९९५ साली सुरू झालेली ही परंपरा आजही सुरूच आहे. पण २०१२ मध्ये राज्यात उपमुख्यमंत्रीपद रिक्त असल्याने ही पूजा तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. तर २०१३ साली अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असताना ऊसदराचा लढा व आंदोलन सुरू असल्याने ते पंढरीला येऊ शकले नाहीत. यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी ही पूजा केली. कार्तिकीच्या शासकीय महापूजेसाठी गोपीनाथ मुंडे हे १९९५ पासून १९९९ पर्यंत पंढरीला यायचे. १२ मे २०१४ रोजी त्यांनी पंढरीत वास्तव्य करून सपत्नीक विठ्ठलाचे दर्शन घेऊन देशात भाजप बहुमत स्पष्ट करेल, असा विश्वास व्यक्त केला होता, तो खराही ठरला.