महापालिकेचे आज अंदाजपत्रक सादर होणार; सोलापूरकरांना काय मिळणार?

By Appasaheb.patil | Published: February 20, 2023 10:58 AM2023-02-20T10:58:23+5:302023-02-20T11:00:00+5:30

उड्डाणपूल भूसंपादनासाठी निधीची तरतूद होणार : करवाढ, दरवाढ नसण्याची शक्यता

Municipal budget will be presented today; What will the people of Solapur get? | महापालिकेचे आज अंदाजपत्रक सादर होणार; सोलापूरकरांना काय मिळणार?

महापालिकेचे आज अंदाजपत्रक सादर होणार; सोलापूरकरांना काय मिळणार?

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक आज, सोमवारी सादर करण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकात केंद्र व राज्य शासनाकडील मोठ्या प्रकल्पासाठी महापालिका हिश्श्याची ३० टक्के रक्कम देण्यासाठी विशेष तरतूद असणार आहे. शिवाय कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला हे अंदाजपत्रक असेल असे सांगण्यात आले. तरीही अन्य तरतुदीकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या अंदाजपत्रकाची माहिती देण्यासाठी आयुक्त शितल तेली-उगले यांनी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 

दरम्यान, मुदत संपल्याने मार्च २०२२ मध्ये सोलापूर महापालिकेवर प्रशासक आले. त्यानंतर मागील दहा महिन्यांत निवडणुकाच झाल्या नाहीत. त्यामुळे यंदाच्या प्रशासकीय राजवटीतील हे अंदाजपत्रक राहणार आहे. मागील वर्षाचे सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे १०५५ कोटी रुपयांचे होते. यंदाचे अंदाजपत्रक नेमके किती रुपयाचे राहणार ? यामध्ये काय काय तरतुदी असतील याची उत्सुकता आता सोलापूरकरांना लागली आहे.

वास्तववादी अंदाजपत्रक राहणार...

सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या तयारीची लगबग गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सुरू होती. सर्व विभागाकडून यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी आढावा घेतला होता. वास्तववादी अंदाजपत्रक राहणार असल्याचे संकेत यापूर्वीच आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिले आहेत. कोणतीही वाढ करण्यापेक्षा थकबाकी वसुलीला प्राधान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

उड्डाणपूल, अमृत योजना मार्गी लागणार

सध्या सोलापुरात दोन उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवाय अमृत योजनेचेही काम सुरू होणार आहे. याशिवाय अन्य राज्य व केंद्र शासनाच्या योजना सोलापुरात राबविण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांसाठी या अंदाजपत्रकात विशेष तरतूद दिसून येईल, असेही सांगण्यात आले.

Web Title: Municipal budget will be presented today; What will the people of Solapur get?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.