सोलापुरातील कोरोनाग्रस्त मृत रूग्णांच्या अंत्यविधीसाठी सरसावले तरुण...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 03:47 PM2020-06-16T15:47:03+5:302020-06-16T15:52:32+5:30
महापालिकेची समस्या सुटली: सोलापूर महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद; टायगर ग्रुपच्या सदस्यांचा पुढाकार
सोलापूर : कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत टायगर ग्रुपच्या सदस्यांनी कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांचा अत्यंविधी उरकण्याची जबाबदारी उचलली आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोना वॉरिअर्स म्हणून तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यात कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मार्गदर्शन व त्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत करण्याच्या समावेश आहे. तसेच कोरोनाने मरण पावलेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी लागणाºया यंत्रणेचे पाठबळ महापालिकेकडे कमी झाले होते. आरोग्य विभागातील बरेच कर्मचारी हे काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे हे काम संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी कोरोनाने मरण पावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी मदत करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे त्यांच्या ग्रुपमधील तानाजी जाधव, श्रीमंत चव्हाण, केतन देवी, मधुकर कुरापाटी, प्रल्हाद कळसकर, सागर राठोड, अवी पवार यांनी काम सुरू केले आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी व समन्वयक पांडे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेऊन अॅम्बुलन्समधून अंत्यविधीच्या ठिकाणी नेणे व ती प्रक्रिया पार पाडेपर्यंत हे तरुण काम करीत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात निर्माण झालेली समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.
महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कविता चव्हाण आणि त्यांच्या ग्रुपने कोरोनाग्रस्तांना अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत नेण्याची जबाबदारी उचलली असून यांचे पथक चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. शहरातील ज्या तरूणांना विविध स्तरावर काम करावयाचे आहे त्या तरूणांनी पुढे यावे़
- पंकज जावळे, उपाआयुक्त, सोलापूर महानगरपालिका