मनपा, पोलिस अधिकारी निष्क्रिय त्यांना समज द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी
By राकेश कदम | Published: September 4, 2023 04:17 PM2023-09-04T16:17:43+5:302023-09-04T16:17:54+5:30
उच्च न्यायालयात तक्रार करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर : शहरातील फूटपाथ, चौकाचौकात फ्लेक्स लावण्याचे प्रकार वाढले आहेत. हे फ्लेक्स हटविण्यात मनपा अधिकारी आणि पोलिस अधिकारी निष्क्रिय ठरले आहेत. त्यांना समज देऊन फ्लेक्स हटविण्यास सांगा अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
कायद्याच्या नाकावर टिच्चून शहरातील चौका-चौकात फ्लेक्स, डिजीटल होर्डिंग लावली जात आहेत. यातून सामाजिक शांतता धोक्यात आल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील वृत्त नुकतेच लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताच्या आधारे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम विभागीय अध्यक्ष शाम कदम आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना निवेदन दिले. उच्च न्यायालयाने होर्डिंग आणि फ्लेक्सबाबत नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करण्याचे काम शहरात सुरू आहे. शहरातील फूटपाथ गायब झाले असून व्यापार धोक्यात आला आहे. मोठ मोठी झाडे तोडून अनधिकृत होर्डिंग लावली जात आहे. पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्याचे प्रमुख् म्हणून आपण मनपा आयुक्त शितल तेली उगले, पोलिस आयुक्त राजेंद्र माने आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन द्यावी. अन्यथा आम्ही उच्च न्यायालयाचा अवमान झाला म्हणून तक्रार दाखल करू. मनपा अधिकाऱ्यांविरुध्द फिर्याद देऊ असा इशाराही शाम कदम यांनी दिला. यावेळी अरविंद शेळके, सीताराम बाबर, राजेंद्र माने, दत्तात्रय भिंगणे, ओंकार कदम आदी उपस्थित होते.