दुधनीत शेतकऱ्याचा खून; सोबतचा मित्र पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:15+5:302021-03-20T04:21:15+5:30
अधिक माहिती अशी की, मयत रमेश शरणप्पा निंबाळ (वय-४२) शेती व्यवसाय करीत होता. त्याचे गावात कोणाबरोबर काहीच शत्रूत्व नव्हते. ...
अधिक माहिती अशी की, मयत रमेश शरणप्पा निंबाळ (वय-४२) शेती व्यवसाय करीत होता. त्याचे गावात कोणाबरोबर काहीच शत्रूत्व नव्हते. अशा अजातशत्रू शेतकऱ्याचा १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने खून करण्यात आला. मयत हा घरातून द्राक्ष घेऊन येतो म्हणून गेला होता. थेट कोलकेरी तलाव जवळील शेतात खून करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे.
मयत रमेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी शवविच्छेदन होणार आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय जाधव, सपोनि सी. बी. बेरड आदींनी भेट दिली.
----पोलीस चौकशीनंतर उकलणार गूढ
सदर व्यक्तीचा खून भर दिवसा झाला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचे गूढ आता त्या प्रसंगी त्याच्या सोबतीला असलेल्या प्रत्यक्षदर्शनी सैदप्पा व्हसुरे याच्याशी पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे. काही महिन्यांपासून शांत असलेले दुधनी शहर पुन्हा या निमित्ताने चर्चेला आले आहे.