अनैतिक संबंधातून पतीने केली पत्नीची हत्या, सांगोला तालुक्यातील चोपडी येथील घटना़
By admin | Published: May 4, 2017 07:21 PM2017-05-04T19:21:46+5:302017-05-04T19:21:46+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि ४ : परपुरुषाशी असणारे अनैतिक संबंध तोडून टाक असे वारंवार सांगूनही पत्नी ऐकत नसल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तीला जागीच जीवे ठार मारले. ही घटना गुरुवार ४ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास चोपडी(ता.सांगोला)नजीक शेटफळ(ता.आटपाडी) हद्दीत घडली आहे. राणी चंद्रकांत बाबर-२५ असे मृत पत्नीचे नाव असून चंद्रकांत प्रल्हाद बाबर-38 असे पतीचे नाव आहे. पत्नीला जीवे ठार मारल्यानंतर पती चंद्रकांत बाबर हा स्वत:हून सांगोला पोलीस स्टेशनला हजर राहून घटनेची माहिती पोलीसांना दिली आहे.
चोपडी(ता.सांगोला)येथील चंद्रकांत प्रल्हाद बाबर हा मुंबई (कळंबोली)येथे कंटेनरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याने तो पत्नी राणी व मुलासह के.एल.सेक्टर ६, बिल्डिंग नं. १९, रुम नं. ८ येथे निवासी राहत होता. दरम्यानच्या काळात पत्नी राणीचे शेजारीच राहणाऱ्या एका इसमाबरोबर अनैतिक संबंध असल्याचे संशय चंद्रकांत यास आला होता. या कारणावरुन दोघा पती-पत्नीत अनेकवेळा भांडणे होत होती. पत्नी राणी नवरा चंद्रकांत व मुलास सतत शिवीगाळी करीत अपमानास्पद वागणुकही देत होती. चंद्रकांत ने पत्नी राणी हीस झाले तेवढे पुरे झाले....म्हणून समजूनही सांगितले होते. मात्र पत्नी काही केल्याने ऐकत नव्हती. मागील तीन आठवड्यापूर्वी चंद्रकांत बाबर पत्नी मुलासह गावी आला होता. गुरुवार 4 मे रोजी चंद्रकांत बाबर याने पत्नी राणीस आपण पाहुण्याकडे जावून येवू असे म्हणून तो शेटफळ(ता.आटपाडी)कडे जात असताना वाटेत जंगलामध्ये थांबले होते. यावेळी, चंद्रकांतने पत्नीस तुझे परपुरुषाशी असणारे अनैतिक संबंध तोडून टाक असे सांगण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये भांडणे झाली. यावेळी चंद्रकांत ने रागाच्या भरात पत्नी राणीच्या डोक्यात दगड घालून जागीच जीवे ठार मारले. या घटनेनंतर चंद्रकांत बाबर याने घडलेल्या प्रकाराची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला हजर राहून सांगितली. यावेळी, पो.नि.हारुण शेख यांनी सदरची घटना सांगोला हद्दीत की आटपाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत याची शहानिशा करण्यासाठी चंद्रकांत बाबर यास सोबत घेवून घटनास्थळी रवाना झाले आहेत. हद्दीनंतरच या घटनेची सांगोला पोलीसात नोंद करण्यात येईल अशी माहिती पो.नि.हारुण शेख यांनी दिली आहे.