बार्शीत विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:06+5:302021-04-11T04:22:06+5:30
बार्शी : उपळाई रोडवर एका विवाहितेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून या घटनेने परिसरात खळबळ ...
बार्शी : उपळाई रोडवर एका विवाहितेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रूकसार अलीम मुलाणी (वय २८, उपळाई रोड, बार्शी ) असे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव असून ९ एप्रिल राेजी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. चारित्र्याच्या संशयावरुन दुसऱ्या जावयाने गळा दाबून खून केल्याची फिर्याद मृताची आई जुबेदा म. हुसेन खान (वय ६०, रा. गडेगाव रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी (वय २५, रा. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार हा दहा वर्षांपूर्वी रूकसार मुलाणी हिचा विवाह बारंगुळे प्लॉट येथील अलीम नजीर मुलाणी यांच्यासोबत झाला होता. त्यानंतर रुकसारला अब्बास मुलाणी व उमेरा मुलाणी ही दोन मुले झाली. आई जुबेदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रुकसारचा पहिला पती अलीम मुलाणी हा कामधंदा करीत नव्हता. त्याला दारुचे व्यसन जडले होते. तसेच तो पत्नीवर सतत संशय घेत होता. कंटाळून रुकसार ही माहेरी आईकडे रहायला आली होती. त्यानंतर ती महिनाभरापूर्वी सांगोला येथे एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी गेली असता तेथे तिचे रिहानशी प्रेमसंबंध निर्माण झाले.
रिहानने ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगून दोन्ही मुलांचा संभाळ करायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघे लग्न करून बार्शीत उपळाई रोडवर शंभर फुटी रोड येथे राहायला आले . त्यानंतर दोन्ही मुलांना महाबळेश्वर येथील मदरशामध्ये ठेवले.
९ एप्रिल रोजी सायंकाळी आई पुन्हा मुलीकडे गेली असता दाराला बाहेरून कडी लावल्याचे दिसले. कडी काढून त्या आत डोकावल्या असता रुकसार ही किचनमध्ये निपचित पडलेली दिसली. तिच्या नाका, तोंडातून रक्त येत होते. शरीराची हालचाल ही थांबली होती. तिने नातेवाईकांना बोलवून मुलीला सरकारी दवाखान्यात हलविले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर आईने पोलिसात धाव घेत दुसऱ्या पतीने गळा दाबून मुलीचा खून केल्याची फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.
---
त्या दोघांमध्ये जेवणावरुन झाला होता वाद
घटनेच्या एक दिवस आधी ८ एप्रिल रोजी जेवणाच्या कारणावरून रुकसार आणि रिहान या दोघात वाद झाला होता. रिहान हा फोन वापरु देत नाही, चारित्र्यावर संशय घेत असल्याचे रुकसारने आईला सांगितले होते. त्यानंतर आईने त्यांच्यातील वाद मिटवला आणि त्या घरी गेल्या होत्या.