धक्कादायक; सांगोला तालुक्यात दोघांचा मर्डर; कोळे गावातील मोठी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 10:37 AM2024-03-23T10:37:52+5:302024-03-23T10:38:28+5:30
दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अरुण लिगाडे, सांगोला : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळे (ता. सांगोला) येथे दोन गटात चाकू धारदार शस्त्र, काठी, लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणीत दोघांचा खून करण्यात आला तर दोन्ही गटातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, अज्ञात कारणावरून सहाजणांनी संगणमत करून चाकूने पोटात भोसकून एकाचा खून केला तर एकास पोटात भोसकून गंभीर जखमी केले तर दुस-या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून सहाजणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत एकाचा खून केला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कोळे (ता. सांगोला) गावात घडली. बाळू शामराव आलदर (रा. संत तुकाराम नगर ,आलदर वस्ती कोळे ता. सांगोला) व सुरज उर्फ बंड्या रमेश मोरे (वय ३१, रा. आंबेडकर नगर, कोळे ता. सांगोला) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत, कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी समवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेवून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.