तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 09:31 AM2024-11-27T09:31:07+5:302024-11-27T09:31:35+5:30
तरुणाच्या डोक्यावरील केस काढल्याने फक्त कवटी दिसत होती. बरगडीचे तुकडे, मणकाही पूर्णपणे तुटलेला होता.
Barshi Murder Case ( Marathi News ) : दोन दिवसांपूर्वी खून केलेल्याचे प्रेत गाताची वाडी हद्दीत सापडल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् तपासाअंती त्या मृतदेहाची ओळख पडली. रोशन शंकर पवार (वय १९, रा. पालघर, कोकण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. २४ नोव्हेंबर रोजी अज्ञात कारणावरून कोणीतरी त्याचा खून केला आणि ओळख पटू नये म्हणून मृतदेह गाताची वाडी हद्दीत टाकून दिला. त्यानंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व त्यांच्या पथकाने पंचनामा केला आणि प्रेत ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले. डॉ. राऊत यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या अहवालानुसार मृताच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले होते. डोक्यावरील केस काढल्याने फक्त कवटी दिसत होती. बरगडीचे तुकडे, मणकाही पूर्णपणे तुटलेला होता.
दुसरे सीमकार्ड टाकल्याने शोध
मृत युवकाकडे असलेल्या मोबाइलमध्ये सीमकार्ड नव्हते. त्यामुळे सायबर क्राइमची मदत घेण्यात आली. त्या मोबाइलमध्ये दुसरे सीमकार्ड टाकून पाहिले असता तो युवक पालघरचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी रक्ताचे आणि मातीचे नमुने घेण्यात आले. तपासासाठी तीन पथके पाठवण्यात आल्याचे तपास अधिकारी तथा फौजदार दीपक ढेरे यांनी सांगितले. पोलिस कॉन्स्टेबल दशरथ बोबडे यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.