महाळुंगमध्ये युवकाचा खून; तीन संशयित आरोपी ताब्यात
By काशिनाथ वाघमारे | Published: February 3, 2024 07:08 PM2024-02-03T19:08:30+5:302024-02-03T19:08:45+5:30
महाळुंग (ता. माळशिरस) येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) या युवकाची गावातील स्मशानभूमीत निर्घृण खून झाला.
सोलापूर: महाळुंग (ता. माळशिरस) येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) या युवकाची गावातील स्मशानभूमीत निर्घृण खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवार, १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळ ग्रामस्थांना मृतदेह दिसला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत युवक शिवाजी चव्हाण हा अकलूज येथील साखर कारखान्यांमध्ये काम करत होता. तसेच तो हलगी वाजवण्याचेही काम करायचा. रात्री कार्यक्रमामधून हलगी वाजून शिवाजी घरी आला होता. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतदेह आढळला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे.
पंढरपूरचे डीवायएसपी अर्जुन भोसले, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पीएसआय साळुंखे, पीएसआय महाडिक, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉ. संजय चंदनशिवे, किशोर गायकवाड, यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवून, पंचनामा केला आहे, डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढील तपासासाठी पोलिसांना सूचना देऊन, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथके पाठवली आहेत. महाळुंग गावातीलच काही संशयतांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
महाळुंगमध्ये पोलिस बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच गावातील बघ्यांनी स्मशालभूमीत गर्दी केली होती. अकलूज पोलीस स्टेशनने महाळुंग गावामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे. सकाळी अकलूज पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबसाठी नमुने देखील घेतले आहेत, श्वान पथकाला देखील बोलवण्यात आले आहे, घटनास्थळी दुचाकी गाडी, मोबाईल, दोन धारदार लोखंडी तीक्ष्ण हत्यारे, दिसून येत आहेत. शव विच्छेदनासाठी मृतदेह अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.