राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:49+5:302021-07-16T04:16:49+5:30

मोहोळ : नगर परिषदेच्या राजकारणातून कट रचून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संगनमत करून डबल सीट दुचाकीस्वारांवर पाठीमागून टेम्पो घालून शिवसैनिकाचा ...

Murder of Shiv Sainik by NCP workers | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाचा खून

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाचा खून

Next

मोहोळ : नगर परिषदेच्या राजकारणातून कट रचून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संगनमत करून डबल सीट दुचाकीस्वारांवर पाठीमागून टेम्पो घालून शिवसैनिकाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ घडली. सतीश नारायण क्षीरसागर (रा. सिद्धार्थनगर, मोहोळ), असे खून झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. दुचाकीवरील विजय सरवदे हा जखमी झाला.

याप्रकरणी राष्ट्रवादीचे संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे व टेम्पो चालक भय्या असवले या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यापैकी भैय्या असवले याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी शहरातील प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थनगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून सुनावणीत प्रांताधिकाऱ्यांनी ती बोगस नावे कमी केली होती. याचा कार्यकर्त्यांच्या मनात याचा रोष होता.

दरम्यान, नगर परिषदेेच्या रमाई घरकुल आवास योजनेच्या २८ मंजूर फाइल गायब झाल्या होत्या. त्या फायलीबाबत आवाज उठवत २८ जून रोजी शहर शिवसेनेेच्या वतीने या दोन कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. दुसऱ्या दिवशी या सर्व गोष्टींचा रोष मनात धरून तुझी फाइल मीच गडप केली आहे. जा तुला काय करायचे आहे ते कर, अशी धमकी या कार्यकर्त्यांना दिली होती, तर राजकीय द्वेषातूनच ३१ डिसेंबर २०१९ रोजी गावठी रिव्हाल्व्हरने पायात फायरिंग करून तुम्हाला खल्लास करण्यात येईल, असे धमकावण्यातही आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत मयताचा भाऊ दादाराव क्षीरसागर याने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली असून, त्या चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

----

घरी परतताना पाठिमागून टेम्पो दुचाकीला धडकवला

या सर्व गोष्टींचा रोष मनात धरून बुधवार, १४ जुलै रोजी भय्या असवले, संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे यांनी एकत्रितपणे येऊन कट रचला. सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांना टेम्पो चालक भय्या असवले याच्या माध्यमातून या दोघांना जेवण करण्यासाठी बोलावले होते. जेवण करून सतीश क्षीरसागर व विजय सरवदे हे दोघे (एमएच-१३/सीपी-०६८७) या दुचाकीवरून घरी परतत असताना पाठोपाठ भैय्या असवले याने टेम्पो (एमएच-१३/एएक्स-४९०८) पाठीमागून वेगात आणून दुचाकीवर घातला. या घटनेत सतीश क्षीरसागर हा जागीच ठार झाला, तर विजय सरवदे हा गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----

१८ तासानंतर घेतला मृतदेह ताब्यात

अपघाताचा बनाव करून घातपात करणाराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, यासाठी पोलीस ठाण्यासमोर नातेवाइकांसह सिद्धार्थनगर परिसरातील नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर १७ तासानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान घटनेची गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे हे घटनास्थळी तळ ठोकून होते.

---

फोटो : सतीश क्षीरसागर

Web Title: Murder of Shiv Sainik by NCP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.