पूर्ववैमनस्यातून अक्कलकोटमध्ये दगडाने चेहरा ठेचून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:43+5:302021-08-22T04:26:43+5:30

अक्कलकोट : भीमनगर येथील एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून दगडाने चेहरा ठेचून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ ...

Murder of a youth by crushing his face with a stone in Akkalkot out of prejudice | पूर्ववैमनस्यातून अक्कलकोटमध्ये दगडाने चेहरा ठेचून तरुणाचा खून

पूर्ववैमनस्यातून अक्कलकोटमध्ये दगडाने चेहरा ठेचून तरुणाचा खून

Next

अक्कलकोट : भीमनगर येथील एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून दगडाने चेहरा ठेचून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

महेश सुरेश मडीखांबे (३५, रा. भीमनगर, अक्कलकोट) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, शनिवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास बासलेगाव रस्त्याच्या बाजूला शेख बाबा दर्गासमोर ही घटना उघडकीस आली. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी त्याचा भाऊ हर्षद सुरेश मडीखांबे (२७, रा. भीमनगर, अक्कलकोट) याने पाेलिसांत संशयित आरोपीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार या घटनेतील आरोपी दिलीप मडीखांबे, यलप्पा मडीखांबे यांच्या नातेवाइकांमधील एका व्यक्तीचा मागील वर्षी अक्कलकोट येथे खून झाला होता. त्या प्रकरणात महेश याचा सहभाग होता. त्या प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर काही दिवसांनी या घटनेतील आरोपींनी मैत्री केली होती.

दरम्यान, त्याच्या महेश याला नातेवाइकांनी मैत्री करू नको असे बजावले होते. तरीही तो ऐकला नाही. नेहमीप्रमाणे महेश हा रात्री जेवण करीत असताना आरोपी हे कट रचून घरी आले. त्याला बाहेर बोलावले असता, भाऊ हर्षद याने त्यास बाहेर जाण्यास विरोध दर्शविला होता. तरीही तो त्यांच्यासोबत बाहेर निघून गेला.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक पुजारी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

----

गर्दीत डोकावले.. दिसला भावाचा मृतदेह

महेश हा मित्रांसमवेत बाहेर गेल्यानंतर तो रात्री घरी परतलाच नाही. त्याचे कुटुंब रात्रभर चिंतित होते. शनिवारी सकाळी भाऊ हर्षद हा कामावर निघाला होता. बासलेगाव रस्त्यावरून जाताना त्याला शेख बाबा दर्ग्यासमोर रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी दिसली. तो थांबला आणि गर्दीत घुसून डोकावला असता त्याने निरखून पाहिले. तो मृतदेह स्वत:च्या भावाचा असल्याची ओळख पटली. त्याने महेशचे कपडे, मास्क, चप्पल, पहावून टाहो फोडला. तत्काळ पोलिसांना खबर दिली. मृतदेह हा भावाचा असल्याचे सांगितले.

---

श्वान घुटमळत राहिले...

या घटनेनंतर माहिती मिळताच आशिफ शेख, प्रशांत कोली, असपाक मियावाले, चिदानंद उपाध्ये, प्रमोद शिम्पाले, अंबादास दूधभाते, अनिल चव्हाण यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी श्वान पथकाला आणि फिंगर प्रिंट पथकाला पाचारण केले. पोलिसांचे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळत राहिले. मात्र पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड करीत आहेत.

--------

फोटो : २१ महेश मडीखांबे

२१ अक्कलकोट १

बासलेगाव रस्त्यावर तरुणाचा खून झालेल्या ठिकाणी पाहणी करताना पोलिसांचे पथक.

Web Title: Murder of a youth by crushing his face with a stone in Akkalkot out of prejudice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.