अपहरणाचा बनाव करून युवकाचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:36+5:302021-04-01T04:22:36+5:30
पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार रघुनाथ कांबळे याने १९ फेब्रुवारी रोजी अंध मुलगा राजवैभव कांबळे हा शौचास जातो म्हणून बेपत्ता असल्याची ...
पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार रघुनाथ कांबळे याने १९ फेब्रुवारी रोजी अंध मुलगा राजवैभव कांबळे हा शौचास जातो म्हणून बेपत्ता असल्याची तक्रार कामती पोलिसांत दिली होती.
या तक्रारीमध्ये फिर्यादीने संशयित आठ लोकांची नावे घातली होती. या प्रकरणाचा गुन्ह्याच्या अंगाने तपास करत असताना सबळ पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे यात कोणालाही अटक केली नव्हती. चौकशी केलेल्या संशयित आरोपींपैकी विशाल दत्तात्रय कांबळे (वय २३) व विकी दत्तात्रय कांबळे (१९, दोघे रा. दादपूर, ता. मोहोळ) फरार होते. त्यामुळे त्या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला. त्यांचा शोध घेत असताना ११ मार्च रोजी बेपत्ता मुलाच्या मोबाईलवरून पैसे मागणीचा संदेश त्याच्या नातेवाइकांना आला होता. या आधारावर लागलीच सुत्रे फिरवत सर्वत्र संशयित आरोपींचा शोध सुरू केला.
एसएमएस मिळालेला मोबाईल बंद असल्याने तपास कामात अडचण येत होती. कामती पोलीस ठाण्याची दोन पथके, स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके संशयित आरोपींच्या शोधात होती.
या चार पथकांनी तांत्रिक विश्लेषण व साक्षीदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शोध घेऊन कामती पोलिसांनी विशाल कांबळे व विकी कांबळे यांना ताब्यात घेतले.
या दोघांकडे विचारपूस केली असता १८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री राजवैभव कांबळे याचे हात-पाय बांधून, दोरीने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह एके ठिकाणी पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित आरोपींनी मृतास पुरल्याची जागा दाखवली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, नायब तहसीलदार लिबोरे, वैद्यकीय अधिकारी एम. एम. हरकूड, न्याय सहाय्यक विभागाचे गणेश कदम यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.