लाखोंच्या गुप्तधनाची परस्पर विल्हेवाट; बार्शीतील सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 15:52 IST2019-05-22T15:51:22+5:302019-05-22T15:52:31+5:30
उपळेतील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार : चार वर्षांपूर्वी सापडला होता हंडा

लाखोंच्या गुप्तधनाची परस्पर विल्हेवाट; बार्शीतील सात जणांना अटक
बार्शी : बार्शी तालुक्यातील उपळे (दु.) या गावातील श्रीराम मंदिरासमोरील जागेचे पाच वर्षांपूर्वी खोदकाम करताना मोगल काळातील मिळालेले खापरी हंड्यात व एका चरवीत ठेवलेले पुरातन गुप्तधन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची वाटणी व त्याची परस्पर विल्हेवाट लावणाºया ११ आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७६ लाख ५० हजार रुपयांचे सव्वादोन किलो सोने तर साडेतीन लाखांची ९ किलो चांदी जप्त करून नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अटक केलेल्या सात आरोपींमध्ये अरविंद कचरूलाल वखारिया (६५), विकास आप्पा पाटील (४६), सूर्यकांत नवनाथ बरबडे (४५), सतंजय शशिकांत कुलकर्णी (५०), गोरख दिगंबर बुरगुटे (६३), विलास कल्याण बुरगुटे (६२) व नंदकुमार बुरगुटे (४३, सर्व रा. उपळे दु.) यांचा समावेश आहे. त्यांना २९ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, इतर नवनाथ जगदाळे, महादेव माळी, महादेव मांजरे, विनोद बुरगुटे हे चार जण फरार आहेत.
गुप्तधन मिळाल्यानंतर मंदिराचा कारभार करणाºयांना बोलावून सर्वांनी गुप्तधनाची वाटणी आपापसात करून घेतली. गावात कुणकुण लागल्यावर मंदिरास सोन्याचा कळस बसविण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याची पूर्तता केली नाही. शिवाय या गुप्तधनाची माहितीही शासनास कळवली नाही. गावातील दिलीप कल्याण बुरगुटे यांनी या गुप्तधनाच्या अफरातफरीबाबत पोलिसात तक्रार दिली होती.
याचा तपास बार्शी विभागीय पोलीस अधीक्षक संजय नाईक-पाटील व वैराग पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कापसे यांनी करून अटक केलेल्या सात आरोपींकडून ७६ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला व न्यायालयापुढे हजर केले. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि. ४०६, ४२४, १८३, ४७७ व भारतीय पुरातत्त्व कायदा कलम २० व २१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दागिन्यांच्या स्वरुपात होते गुप्तधन
- जानेवारी-२०१४ मध्ये गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जागेचे उत्खनन करत असताना मोगल काळातील तीन खापरी हांडे व एक चरवी मिळाली होती. त्यात सोन्या-चांदीचे दागिने व गुप्तधन मिळाले होते.