मेरी अम्मा मर गई... तो तीन दिवसांपासून रडतोय, पण त्या मतिमंद मुलाचं कोणीच ऐकलं नाही...!?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:31 AM2020-05-10T10:31:25+5:302020-05-10T10:46:18+5:30
वेळेवर जेवण न मिळाल्याचाही परिणाम; दोन दिवस घरातच होता मृतदेह...
शितलकुमार कांबळे
सोलापूर : शास्त्री नगर येथे राहणाºया वृद्ध दाम्पत्यांचा घरातच मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी काळजी घेण्यासाठी जाता न आल्याने त्यातच वाढलेल्या उन्हामुळे वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे दोन दिवसांनी कळाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
हसीना शिलेदार ( वय ६०) व त्यांचे पती अब्दुलगनी शिलेदार (वय ६५) अशी मृत दाम्पत्यांची नावे आहेत. त्यांना एक मुलगाही असून तो बुद्धीबधीर (मतीमंद) आहे. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्यांची काळजी हे त्यांचे नातेवाईकच घेत होते. रोज त्यांना डबा देणे, त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणे, आंघोळ घालणे ही कामे त्यांचे नातेवाईकच करत होते. लष्कर परिसरात लॉकडाऊन असल्यामुळे डबा द्यायला जाणे व त्यांची काळजी घेणे अवघड झाले होते. अब्दुलगनी शिलेदार हे महापालिकेतून सेवानिवृत्त झाले होते.
मंगळवारी पाच मे रोजी वृद्ध दाम्पत्यांना त्यांचे नातेवाईक अशपाक शिलेदार यांनी आंघोळ घालून जेवण दिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना वृद्ध दाम्पत्याच्या घरी जाता आले नाही. गुरुवारी सात मे रोजी ते घरी गेले असता दोघेही वृद्ध दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून हसिना शिलेदार या आजारीच होत्या. लॉकडाऊनमुळे तीन दिवस दुर्लक्ष झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती अब्दुलगनी शिलेदार यांना हा धक्का सहन न झाल्याने तेही मृत झाले. दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाल्याची शक्यता त्यांच्या नातेवाईक व शेजाºयांनी वर्तवली.
---------------------------
तो म्हणत होता अम्मी मर गई पण कुणीच ऐकले नाही
शिलेदार दाम्पत्यांचा मुलगा हा मनोरुग्ण आहे. आपली आई मृत झाल्याचे त्याला कळाले होते. तो इतरांना अम्मी मर गई असे सांगत होता. पण, तो मनोरुग्ण असल्याने त्याच्या सांगण्याकडे कुणी लक्ष दिले नाही. गुरुवारी अशपाक शिलेदार व त्यांचे इतर नातेवाईक घरी गेल्यानंतर दोघे दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले. शासकिय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-----------------------------–------
लॉकडाऊनमुळे जेवन द्यायला जाण्यात अडचणी आल्या होत्या. आम्हाला तिथे जाता येणे शक्य नव्हते. तीन दिवस आम्हाला त्यांना जेवण देता आले नाही. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मावशीची तब्बेतही बरी नव्हती. तर काकांना त्यांचा मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. ही बाब आम्हाला दोन दिवसानंतर समजली.
- अशपाक शिलेदार, मृत दाम्पत्यांचे नातेवाईक