आयुष्यातील टर्निंग पॉर्इंटवर मदतीचा हात देणारी माझी आई : प्रदीप हिरडे
By appasaheb.patil | Published: July 16, 2019 12:45 PM2019-07-16T12:45:13+5:302019-07-16T12:46:53+5:30
गुरूपोर्णिमा विशेष; मध्य रेल्वेतील वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधकांशी साधला संवाद
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : साधी राहणीमाऩ़़ सर्वसामान्यांना सतत मदतीचा हात पुढे करणारी, गरीब, वंचित, दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून येणारी़़़शिक्षणाचा काडीमात्र गंध नसतानाही माझ्या जीवनाला आकार देत, संस्काररुपी जीवन जगताना दिलेले मौल्यवान धडे आजही माझ्या अंगी तसेच आहेत़ माझ्या संपूर्ण आयुष्यात माझी आईच माझी गुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे जन्मलेले प्रदीप हिरडे हे सध्या भारतीय रेल्वे सेवेतील मध्य रेल्वे विभागातील सोलापूर मंडलात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक या पदावर कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीशी झगडत प्रदीप हिरडे यांनी एमएस्सी (अॅग्रीकल्चर) मधून पदवी प्राप्त केली आहे.
लहानपणापासूनच रेल्वे गाडीचे आकर्षण असलेल्या हिरडे यांनी रेल्वे प्रशासनात नोकरी करण्याची जिद्द व ध्येय उराशी बाळगले होते़ पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे सेवा सरळ भरतीव्दारे रेल्वे प्रशासनात दाखल झाले़ प्रारंभी नागपूर येथे सेवा बजाविली़ त्यानंतर बलारशाह येथे आॅफिसर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भुसावळ येथे सेवा बजाविली़ भुसावळनंतर त्यांची पदोन्नतीने सोलापूर येथे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक या पदावर नियुक्ती करण्यात आली.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूविषयी बोलताना हिरडे म्हणाले की, माझ्यासाठी माझी आई हीच गुरु आहे. तिने पूर्वी कधीही शालेय शिक्षण घेतलेले नसले तरीही तिने मला जीवनातील मौल्यवान धडे शिकवले आहेत.
तिने मला प्रेम, करुणा, मागासवर्गीय लोकांसाठी सेवा करण्याची ऊर्जा दिली़ कोणत्याही पदावर काम करीत असला तरी सर्वसामान्यांची सेवा, त्यांना मदत करणे कधीही टाळू नको असा मौलिक सल्ला माझ्या आईने मला दिला होता.
हॅटस् आॅफ फादर
- आपल्या वडिलांविषयी सांगताना प्रदीप हिरडे म्हणाले की, माझ्या वडिलांचे नाव शहाजी हिरडे़ आमच्या वडिलांचा स्वभाव खरं सांगायचं झालं तर ते अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक व मनमिळावू स्वभावाचे होते़ शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न, सातत्याने करावा लागणारा दुष्काळाचा सामना यामुळे घरची परिस्थिती तशी नाजूक होती़ २० ते ३० वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रचार, प्रसार व महत्त्व नसतानाही माझ्या वडिलांनी भविष्याचा वेध घेत शिक्षणाचे महत्त्व ओळखून आम्हा तिघा भावांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला़ आम्ही तिघा भावंडांसाठी वडिलांनी त्यावेळी घेतलेले निर्णय हे आमच्यासाठी आज टर्निंग पॉर्इंट ठरत आहेत़ त्यामुळे माझ्या वडिलांना आम्हा भावडांकडून हॅटस आॅफ फादऱ़़