माझ्या नावावर भाजपच्या तीन नगरसेवकांनी घेतले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:43 PM2019-06-13T12:43:45+5:302019-06-13T12:46:06+5:30
सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी याचा खळबळजक आरोप; आमचा एक नगरसेवक म्हणजे क्वाईन बॉक्स ?
सोलापूर : भाजपच्या तीन नगरसेवकांनी माझ्या नावावर भवानीपेठेतील एका घरात कंत्राटदारांकडून टक्केवारीचे पैसे घेतले. या कंत्राटदारांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. या नगरसेवकांनी पक्षाला बदनाम करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांची नावे पक्षश्रेष्ठींना कळविणार असल्याचा खळबळजनक खुलासा महापौर शोभा बनशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
महापालिकेच्या आठ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत रस्ते, भुयारी गटारीच्या कामाचे दहा कोटींहून अधिक रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. या प्रस्तावांवरील सूचना आणि उपसूचना महापौरांनी नगरसचिव कार्यालयाला दिल्या नव्हत्या. त्यामुळे गेले तीन महिने हे प्रस्ताव महापौर कार्यालयात पडून होते. याबद्दल पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांना निलंबित करण्याची मागणी केली. नगरसेवक सुरेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा महापौरांवर टीका केली.
अखेर प्रभारी नगरसचिव महमंद रऊफ बागवान यांनी हे सर्व प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठविले. हे ठराव का रोखून ठेवले होते, असा प्रश्न महापौर बनशेट्टी यांना विचारला असता त्या म्हणाल्या, ‘ना खाउंगा - ना खाने दुंगा’ असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पण आमच्या पक्षातील काही नगरसेवकांना हे मान्य नाही. वर्षानुवर्षे कंत्राटदार, मनपा अधिकाºयांकडून पैसे उकळण्याचे काम हे लोक करीत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून शहरात रस्ते आणि भुयारी गटारीची कामे प्रस्तावित झाली. ही कामे करण्यास इच्छुक असलेल्या कंत्राटदारांना आमच्या पक्षातील तीन नगरसेवकांनी बोलावून घेतले.
भवानीपेठेतील घरी त्यांच्याकडून टक्केवारीचे पैसे घेण्यात आले. टक्केवारी दिली नाही तर कामे मंजूर होऊ देणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मनपा सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संमतीने आम्ही दहा कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. यादरम्यान काही कंत्राटदारांनी आमच्याशी संपर्क केला. तुमचे नाव सांगितल्यामुळे आम्ही त्या नगरसेवकांना पैसे दिल्याचे ते सांगू लागले. मला ही गोष्ट पटली नाही. कंत्राटदारांसोबतच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आयुक्तांना हे रेकॉर्डिंग ऐकविणार आहे, असेही बनशेट्टी यांनी सांगितले.
आमचा एक नगरसेवक म्हणजे क्वाईन बॉक्स ?
*- महापौर बनशेट्टी म्हणाल्या, आमचा एक नगरसेवक म्हणजे ‘क्वाईन बॉक्स’आहे. पैसे संपले की तो पत्रकार परिषदा घेऊन आरोप करू लागतो. मनपातील अधिकारी तर त्याला वैतागले आहेत. तो आणि त्याचा नेता काँग्रेसच्या लोकांना हाताशी धरून राजकारण करतात. अलीकडच्या काळात सर्वांनाच ही गोष्ट कळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाटेमुळे आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या. पण या लोकांना आपणच नगरसेवक, खासदार निवडून आणले, असा भ्रम निर्माण झाला आहे. या भ्रमातून ते दुकानदारी करीत आहेत. महापौरपदाचा कालावधी संपल्यानंतर मी त्यांचा आणखी भंडाफोड करणार आहे.