मायबाप सरकार! आम्हाला पंढरपूरला जाण्यासाठी डांबरी रस्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:33 AM2021-02-23T04:33:44+5:302021-02-23T04:33:44+5:30
गेल्या अनेक वर्षापासून तिऱ्हे मार्गे सोलापूर-पंढरपूर रस्ता डांबरीकरण केला नसल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. दुरावस्थेमुळे ...
गेल्या अनेक वर्षापासून तिऱ्हे मार्गे सोलापूर-पंढरपूर रस्ता डांबरीकरण केला नसल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. दुरावस्थेमुळे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी, रस्ता नुतनीकरणासाठी अनेकवेळा प्रशासनाला लेखी पत्र निवेदन देऊनही रस्त्याचे नुतनीकरण केले नसल्याने प्रवाशांसह वाहनधारकांचे हाल होत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील तिऱ्हे मार्गे सोलापूर-पंढरपूर रस्ता खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व डाॅ. जयसिध्देश्वर महास्वामी या दोन खासदारांच्या लोकसभा मतदारसंघातील तर आमदार बबनराव शिंदे व आमदार यशवंत माने यांच्या विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातून जाणारा मार्ग आहे. रस्ता नुतनीकरण करण्यासाठी अनेकवेळा आश्वासन देऊही दोन खासदार, दोन आमदार असताना रस्ता डांबरीकरण होत नसल्याने मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी ॲड. विजयकुमार नागटिळक यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
या पत्रामध्ये माझा नाईलाज आहे, रस्ता डांबरीकरणासाठी रक्तानी पत्र लिहावं लागतं. जिल्ह्यातील सगळे रस्ते डांबरीकरण पूर्ण झाले आहेत. आमचाच रस्ता डांबरीकरण होत नाही. खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तेव्हा मायबाप सरकारला आमची विनंती आहे, आमचा पंढरपूर तिऱ्हे मार्गे सोलापूर रस्ता डांबरीकरण करून देऊन जनतेचा दुवा घ्यावा. ही आमची मागणी पूर्ण करावी. आम्ही तुमच्याकडे दुसरे काही मागत नाही. सुखरूप प्रवास होण्यासाठी फक्त रस्ता डांबरीकरण मागतोय, तेव्हा हात जोडून विनंती आहे. त्वरित रस्ता डांबरीकरण करून मिळावा, असे ॲड. विजयकुमार नागटिळक यांनी पत्रात लिहिले आहे.
फोटो ओळी :::::::::::::::
स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिताना ॲड. विजयकुमार नागटिळक.