"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:59 PM2024-08-23T13:59:21+5:302024-08-23T14:00:27+5:30
ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे (वय ८०, रा. कानाड गल्ली, करमाळा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्या करण्यापूर्वी तशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. करमाळा शहरातील बलभीम राखुंडे हे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष असून ते करमाळ्याचे दहा वर्षे नगरसेवक राहिलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या करूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने ते उद्विग्न होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे. माझी कोणतीही तक्रार नाही मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून खाली सही करून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे निदर्शनात आले.
करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक ती कार्यवाही करून राखुंडे यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. माजी नगरसेवक बलभीम दादा राखुंडे यांच्या पाठीमागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.