ग्रामस्थ अन् लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ‘माझे गाव कोरोनामुक्त’ अभियान राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:06 PM2020-12-02T13:06:21+5:302020-12-02T13:07:47+5:30
झेडपीचे अभियान : अन्यथा खासगी डॉक्टरांवर दाखल होणार गुन्हे
सोलापूर : दिवाळीनंतर चाचण्या वाढविल्या तरी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे चित्र असून, त्यामुळे आता लोकसहभागातून ‛माझे गाव कोरोनामुक्त’ हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे कुंभारी येथे कोरोना साथीच्या आढाव्याबाबत जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी कोरोना साथीचा आढावा घेतला. ग्रामीण भागात चाचण्या वाढविण्यात आल्या असून, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण खूपच खाली आले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील मातांची सुरक्षित प्रसूती व बाळांचे लसीकरण यावर भर असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्यादृष्टीने ‘माझे गाव कोरोनामुक्त’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यात गावपातळीवर जनता व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व यंत्रणाच्या सहभागाने प्रभावी लोकचळवळ उभारण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जनजागरण, लोकांमध्ये आत्मविश्वास, तपासण्या वाढविणे, यंत्रणा सक्रीय करणे आणि स्वच्छता व निर्जुंकीकरण अशा पंचसूत्रीवर भर दिला जाणार आहे. या अभियानात कोरोना चाचण्या घेण्यासाठी जिल्हातील खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार असून, जे डॉक्टर नकार देतील त्यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा इशारा स्वामी यांनी दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. सोनिया बागडे, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. शिवाजी थोरात, डॉ. मोहन शेगर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय शेगर, प्रचार अधिकारी रफिक शेख उपस्थित होते.
मुख्यालयात मुक्काम बंधनकारक
मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहणे बंधनकारक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले. मृत्युदर खाली आणण्यासाठी उपचार यंत्रणा गतीशील करावी अन्यथा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.