यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:54+5:302021-03-09T04:24:54+5:30
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्याकडे असलेला हिंदू कैकाडी जातीचा दाखला बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून ...
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्याकडे असलेला हिंदू कैकाडी जातीचा दाखला बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मिळविला असल्याची क्षीरसागर यांची तक्रार बुलडाणा जात पडताळणी समितीने फेटाळून लावली होती. या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे पुर सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर खंडपीठात बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात दाखल केलेली याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे.
क्षीरसागर यांच्या विरोधात बुलडाणा जात पडताळणी समितीने आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हनुमंत माने याना दिलेला निर्णय नागपूर खंडपीठाने कायम ठेवत आ. माने यांना दिलासा दिला आहे. माने यांच्या शेळगाव (ता. इंदापूर) गावातील विलास देवराज भांगे यांनीही २०१७ मध्ये आ. माने यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समितीकडे तक्रार केली होती. या प्रकरणातदेखील भांगे यांची तक्रार ११ सप्टेंबर २०१८ ला समितीने आम्हाला एखाद्या झालेल्या निर्णयावर पुन्हा पुनर्निर्णय देता येत नाही, या मुद्द्यावर फेटाळली होती. त्यानंतरच सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर खंडपीठाकडे सदर जात पडताळणीच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (भटक्या जमाती), इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० नुसार व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यांनुसार समितीला पुनर्निर्णयाचे अधिकार प्राप्त नसल्याचे कारण देत समितीने क्षीरसागर यांची तक्रार निकाली काढली होती. या निकालाविरोधात नागपूर खंडपीठाकडे क्षीरसागर यांनी याचिका दाखल केली होती.