उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ अव्वल; राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 5, 2023 06:56 PM2023-01-05T18:56:58+5:302023-01-05T18:57:12+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस २८ गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस २८ गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. सर्वसाधारण विजेतेपदाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक २७ गुणांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस २३ गुणांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सोलापूर विद्यापीठ कॅम्पस येथे करण्यात आले होते. गुरुवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला.
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे जागतिक ख्यातीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव, जेष्ठ पत्रकार अभय दिवाणजी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थिती होती.