कलियुगात नामजपाला सर्वाधिक महत्व...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 03:36 PM2018-12-29T15:36:38+5:302018-12-29T15:42:15+5:30
कलीयुगात सर्वात जास्त महत्व नामजपाला आहे. ते सर्वांना सोपे असल्याने संतांनी नामजपालाच प्राधान्य दिले आहे़ नामजपानेच मानवाचा उद्धार होतो. ...
कलीयुगात सर्वात जास्त महत्व नामजपाला आहे. ते सर्वांना सोपे असल्याने संतांनी नामजपालाच प्राधान्य दिले आहे़ नामजपानेच मानवाचा उद्धार होतो. अठरा पगड जातीतील लोकांना संत नामदेवांनी एका झेंडयाखाली आणले व त्यांच्या मुखी पंढरीचे नाव दिले त्यातूनच त्यांचा उद्धार झाला. संत नामदेवांचा अभंग नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे या अभंगावर त्यांनी निरुपण केले. परमेश्वराचे नाव कानावर पडल्यावर ते अगदी सहजतेने आपल्याही मुखातून आले पाहिजे. नाम जरी फुकट असले तरी त्याला किंमत नाही असे समजू नका. नामजपातून अखंडपणे, अविरतपणे अमृत मिळते. म्हणूनच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असे संतांनी म्हटले आहे.
कीर्तन हे परमेश्वराच्या भक्तीचे प्रभावी माध्यम आहे. किर्तनातूनच परमेश्वराची स्तुती करता येते. परमेश्वराच्या भक्तीतूनच जीवन उद्धारण्याचा मार्ग मिळतो म्हणून भक्तीमार्गाची कास धरून वाटचाल करा़ भक्तीमुळे जीवाचा उद्धार होऊन परमेश्वर प्राप्ती होते़ नरदेहाचे सार्थक फक्त परमेश्वर प्राप्तीतच आहे.
कस्तुरीमृगापासून कस्तुरी मिळते, देवगाईच्या शेपटीपासून चवºया बनतात़ गाईपासून पंचगव्य मिळते, तर पशूपासून कातडे मिळते, पण नरदेहापासून काहीच प्राप्त होत नाही. संतांनी नरदेहाला घोंगडीची उपमा दिली असून ही घोंगडी मलीन असल्याने त्यावर संस्कार करून ती भगवंताला अर्पण केली पाहिजे. विवाहाच्या वेळी मुलीला जसे सजवून आणले जाते व मग ती वराला अर्पण केली जाते त्याप्रमाणे आपल्या देहालाही संस्कारित करून परमेश्वराला अर्पण केले पाहिजे.
- ह. भ. प ज्ञानेश्वर भोसले महाराज, सोलापूर