पंढरपूरच्या आषाढी वारीच्या तोंडावर नमामि चंद्रभागेचे तुणतुणे वाजले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 04:25 PM2018-06-27T16:25:51+5:302018-06-27T16:26:35+5:30
सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील यंत्रणांना ३१ जुलैैपर्यंत कालबध्द कृती आराखडा सादर करण्याची सूचना केली.
सोलापूर : आषाढी वारीच्या तोंडावर राज्य शासनाने पुन्हा नमामि चंद्रभागा अभियानाचे तुणतुणे वाजविण्यास सुरुवात केली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पुण्यात बैठक घेऊन सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील यंत्रणांना ३१ जुलैैपर्यंत कालबध्द कृती आराखडा सादर करण्याची सूचना केली.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात नमामि चंद्रभागा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, साताºयाच्या जिल्हाधिकारी डॉ. श्वेता सिंघल, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ सूरज मांढरे, सोलापूरचे डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासह नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांनी सहभाग घेतला.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी निरी या संस्थेशी तातडीने करार करुन घेण्याच्या सूचना केल्या. या अभियानाच्या क्षेत्रात येणारे सर्व औद्योगिक कारखाने आणि साखर कारखान्यांमधून बाहेर पडणाºया सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया होते की नाही, हे पाहण्यासाठी निरी किंवा त्रयस्थ संस्थेकडून नियमित तपासणी करुन घ्यावी, असे आदेश दिले.
केवळ बैठकांचा फार्स
- तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी वाजत-गाजत ‘नमामि चंद्रभागा’ अभियानाची घोषणा केली. परंतु, गेल्या तीन वर्षात पंढरपुरातील सांडपाणी प्रकल्प, नामसंकीर्तन सभागृहाखेरीज प्रदूषणमुक्तीसाठी फारसे काम झालेले नाही. नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत भीमा नदीला उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणमुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यासंदर्भात फारसे काम झालेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी निरी संस्थेशी करार करावा, असे दोन वर्षांपासून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याचेही मंगळवारच्या बैठकीत दिसून आले. विशेष म्हणजे पंढरपुरात करण्यात येणाºया घाटाच्या कामालाही फारशी गती आलेली नाही.
- या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, चंद्रभागेकाठी २२ कोटी रुपये खर्चून १५० मीटर घाट बांधण्यात येणार आहे. या घाटाचे प्रायोगिक तत्त्वावरील १५ मीटरचे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले.