नावाच्या घोळामुळे आमदाराचे नाव कर्जमाफी यादीत : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 07:36 PM2017-12-16T19:36:18+5:302017-12-16T19:39:21+5:30
नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि १६ : नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़
सहकार मंत्री सुभाष देशमुख हे शनिवारी पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
आ़ प्रकाश आबिटकर यांच्याबाबतची घटना ही तांत्रिक बाब असू शकते, असे सांगून सुभाष देशमुख म्हणाले, प्रकाश अबिटकर नावाच्या दोन व्यक्ती आहेत. पण दोघांचे खाते वेगवेगळया बँकेत आहेत. शिवाय प्रकाश सुतार नावाच्या व्यक्तीचे आधार कार्ड, खाते नंबर आणि इतर माहिती तांत्रिक कारणाने ट्रेस न झाल्याने आ़ आबिटकर यांचे नाव कर्जमाफी शेतकºयाच्या यादीत आले असावे, असे देशमुख यांनी सांगितले.
आबिटकर या आडनावाचे एकूण ३७ अर्ज आहेत. तसेच प्रकाश आबिटकर या नावाने सुध्दा एक अर्ज आहे, पण तो आमदारांचा नाही़ अर्ज नसतानाही कोल्हापूर जिल्हा बँकेने आ. प्रकाश आबिटकर यांचे खाते या योजनेच्या लाभासाठी सरकारकडे पाठविले़ एक अर्ज प्रकाश सुतार या व्यक्तीच्या नावाने आहे़ प्रकाश आबिटकर आणि प्रकाश सुतार या दोघांचाही एकच कर्जखाते क्रमांक कोल्हापूर जिल्हा बँकेने दिला आहे. त्यामुळे आ. प्रकाश आबिटकर यांचे नाव यादीत आले. हे दोन्ही खाते १८ महिन्यांचे पीककर्ज घेतलेली खाती आहेत. दोघांनीही पूर्ण कर्ज परत केले आहे. शिवाय आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आ. प्रकाश अबीटकर यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने ही चूक दुरूस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले़
कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरलेल्या सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांनी गोंधळून जाऊ नये, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले़
एफआरपी देणे बंधनकारक
जे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणार नाहीत़ त्यांच्यावर कारवाई होणारच आहे़ एफआरपी देणे बंधनकारक आहे़ शिवाय आगामी काळात साखर कारखान्यातील वजन काटे आॅनलाईन करत आहोत, अशी माहिती ही सुभाष देशमुख यांनी दिली.