नावात साम्य असलेला अस्थिकलश बदलला; वाद गेला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:48 PM2019-09-10T14:48:25+5:302019-09-10T14:49:59+5:30
सोलापुरातील शिवधाम स्मशानभूमीतील प्रकार: पुन्हा अस्थी गोळा करून केले विसर्जन
संताजी शिंदे
सोलापूर : अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतील एका खोलीत ठेवण्यात आलेला अस्थिकलश बदलल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातला. नावात साम्य असल्याने निर्माण झालेला वाद पोलीस ठाण्यात गेला. पुन्हा त्याच व्यक्तीच्या दुसºया अस्थी गोळा करून दिल्याने वाद मिटला अन् नातेवाईकांनी त्याचे भीमा नदीत विसर्जन केले. अक्कलकोट रोड सार्वजनिक सुधारणा समिती शिवधाम येथे हा प्रकार घडला.
शिवधाम स्मशानभूमीत दि. ३१ आॅक्टोबर व १ सप्टेंबर २0१९ रोजी श्रीनिवास नावाच्या दोन व्यक्तींचा अंत्यविधी करण्यात आला होता. परंपरेप्रमाणे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर दुसºया दिवशी माती सावडण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावाचे अस्थिकलश तयार करून ते स्मशानभूमीतील एका खोलीत लोखंडी अँगलला बांधून ठेवण्यात आले. दहा दिवसानंतर श्रीनिवास नावाचा अस्थिकलश रविवारी संबंधित नातेवाईकांनी नेला. रितीरिवाजाप्रमाणे अस्थीचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी श्रीनिवास नावाचा दुसरा कलश घेण्यासाठी संबंधित नातेवाईक शिवधाम स्मशानभूमीत आले. स्मशानभूमीतील शिपायाला खोली उघडण्यास सांगितले, आतमध्ये त्याच नावाचा अस्थिकलश होता; मात्र तो त्या नातेवाईकांनी ठेवलेला नव्हता.
नातेवाईकांनी हा अस्थिकलश आमचा नाही असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नेमणुकीला असलेल्या शिपायाला मोठा प्रश्न पडला, त्याने तोच आहे असे सांगितले. नातेवाईकांनी नकार देत आमचा अस्थिकलश कोठे आहे? असा प्रश्न केला. शिपायाला काही समजेना, नातेवाईकांनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी याची शहानिशा केली; मात्र दोन्ही अस्थिकलशावर एकसारखे नाव व आडनाव असल्याने सर्वांची पुरती पंचायत झाली. शिपायाने शक्कल लढवली, नातेवाईकांना त्यांच्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याची राख कोठे टाकली आहे अशी विचारणा केली. नातेवाईकांनी राख टाकलेली जागा दाखवल्यानंतर त्यातील अस्थी काढून पुन्हा नवीन कलश तयार करून दिला.
खोलीत असलेली श्रीनिवास नावाची अस्थी नेमकी कोणाची?
- श्रीनिवास हे नाव व आडनाव एकच असलेल्या अस्थिकलशाच्या वादानंतर तो वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. आमचा अस्थिकलश नसल्याची तक्रार करणाºया नातेवाईकांनी दुसºया अस्थी नेल्या. पहिल्यांदा अस्थिकलश नेलेल्या नातेवाईकांनी तर तो आमचाच होता असा दावा केला आहे. मग आता याच रुममध्ये लोखंडी अँगलला अडकावण्यात आलेला अस्थिकलश कोणाचा? असा प्रश्न स्थशानभूमीतील शिपायाला व अन्य लोकांना पडला आहे.
नावात साम्य असल्याने अस्थिकलश घेऊन जाण्यात गल्लत झाली होती. हरकत घेतलेल्या नातेवाईकांना त्यांच्या व्यक्तीचा पुन्हा दुसरा अस्थिकलश तयार करून देण्यात आला आहे. या बाबत नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. वाद मिटला असून दोन्ही नातेवाईकांचे समाधान झाले आहे.
- जे.एन. मोगल, पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे