बिनविरोधच्या नावाखाली दिला अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:15+5:302021-01-08T05:11:15+5:30
दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून ...
दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून दिला त्या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईची मागणी होत आहे. निवडणूक विभागाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी ३ पर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार होते. मात्र काही गावांमध्ये पॅनलप्रमुख व उमेदवारांनी ग्रामपंचायत बिनविरोध होईल. यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे काही गावांना अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून दिला. मात्र रात्री ६ वाजेपर्यंतही त्या गावात बिनविरोधवर एकमत होत नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चलबिचल सुरू होती. शेवटी गावामध्ये दोन्ही पॅनल समोरासमोर आल्याने बिनविरोधवर एकमत न होता अधिकाऱ्यांसमोरच वाद-विवाद होण्याची शक्यता निर्माण होताच अधिकाऱ्यांनी उशिरा पोलिसांना पाचारण केले. शेवटी काही ग्रामपंचायती बिनविरोध तर झाल्याच नाहीत; मात्र बिनविरोधसाठी थांबलेले तेच उमेदवार रात्री चिन्हे घेऊन गावाकडे परतले. बिनविरोधच्या नावाखाली काही गावे, उमेदवारांना वेळ कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमाखाली वाढवून दिला त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
-----
नागरिकांचं गाऱ्हाणं...
७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार विवेक साळुंखे यांची नियुक्ती केली आहे. तर त्यांना सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तहसीलच्या आवारात गोंधळ घडूनही त्यांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले. नायब तहसीलदारांनी शासकीय कामानिमित्त परगावी असल्याचे तर तहसीलदारांनी माहिती घेतो, असे सांगून वेळ मारून नेल्याचे खेड भाळवणीचे दत्तात्रय साळुंखे, लक्ष्मण साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
------
काही गावांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आमची सही नाही, अशा हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे काही गावांच्या प्रक्रिया थांबवून त्यांच्या समक्ष आधार कार्ड, इतर कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे चिन्हवाटपाला वेळ लागला. मात्र काही ठिकाणी वेळ वाढवून देण्याचा प्रकार व चिन्ह वाटून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा प्रकार घडला असल्यास आपण याबाबत माहिती घेऊ.
- विवेक साळुंखे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, पंढरपूर