मृत्यूस जबाबदार असलेल्या नातेवाईकांची नावे व्हाट्सअप टाकून जावयाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 09:08 AM2020-11-03T09:08:00+5:302020-11-03T09:08:39+5:30
सांगोला तालुक्यातील घटना; पत्नी, सासू, सासरे व मामाविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला : न्यायालयातील पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी १० लाख रूपयाची मागणी करून पत्नी सासू-सासरे मेव्हणा व मामाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला कंटाळून ३६ वर्षीय जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने माझ्या मृत्यूस पत्नीसह तिचे नातेवाईकच जबाबदार आहेत असे मेसेज व्हाट्सअपद्वारे घरातील नातेवाईकांसह मित्रांना पाठवून गळफास घेतला. ही घटना सोमवार २ रोजी सकाळी ९ च्या सुमारास नाझरे (सरगरवाडी, ता.सांगोला ) येथे घडली. स्वप्नील उत्तम शिरदाळे (वय ३६) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
सरगरवाडी (ता. सांगोला) येथील स्वप्निल उत्तम शिरदाळे याची पत्नी पूजाने मंगळवेढा न्यायालयात स्वप्निल याच्याविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला. हा दावा काढून घेण्यासाठी सप्टेंबर २०१८ ते सोमवार २ ऑक्टोंबर २०२० सकाळी ९ वाजेपर्यंत पत्नी पूजा स्वप्निल शिरदाळे, सासु कस्तुराबाई मल्लिकार्जुन बुरकुल, सासरे मल्लिकार्जुन तुकाराम बुरकुल, मेव्हणा तुकाराम मल्लिकार्जून बुरकुल सर्वजण (रा. आंधळगाव) व मामा चंदू पाटील धर्मगाव (ता. मंगळवेढा) यांनी संगनमत करून वारंवार स्वप्निल यास नातेवाईकांवर केस करण्याची धमकी देवून व न्यायालयातील पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी १० लाख रुपयाची मागणी करून तगादा लावला होता.
पत्नी सासू-सासरे मेहुणा व मामा यांच्या सततच्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रासाला कंटाळून स्वप्निल शिरदाळे यांनी गट नंबर १२६ मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. दरम्यान शेजारी शेतकरी गृहस्थ महादेवाच्या दर्शनासाठी निघाले असता त्यानी स्वप्निलने गळफास घेतल्याचे पाहून त्याच्या घरी कळविले. याबाबत भाऊ प्रकाश उत्तम शिरदाळे (रा.सरगरवाडी) याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी पाच जणाविरूध्द स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.