नाना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात म्हणजे चर्चा तर होणारच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:19 PM2019-06-06T14:19:36+5:302019-06-06T14:24:29+5:30
सोलापूर जिल्ह्याचे राजकारण; भेटीचे कारण साखर कारखान्याचे, खलबते मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साखर कारखान्याच्या कामाबाबत चर्चा केली. त्यांच्या भेटीतील विषय कोणताही असो, पण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याने ‘नाना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात म्हणजे चर्चा तर होणारच!’, अशी चर्चा पंढरपूर, मंगळवेढ्यात रंगू लागली आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ४ जून रोजी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आ. भारत भालके हेही उपस्थित होते. शिवाय आ. भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. याबाबत आ. भालके यांना विचारले असता, ‘लोक काहीही चर्चा करतात’ असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांशी माढ्याचे खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील, स़ शि़ वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनीही अशीच उत्तरे दिली होती़ त्यानंतर त्या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला़ ही काही खूप जुनी गोष्ट नाही़ ही घटना ताजी असतानाच आता मुख्यमंत्र्यांना आ. भारत भालके भेटून चर्चा करतात़ त्यामुळे तेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार ? अशी नागरिकांमधून चर्चा होणे स्वाभाविक आहे़
आ़ भारत भालके हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यावर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी मिळणार का? अशीही चर्चा आहे़ परंतु हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे़ त्यामुळे ही जागा शिवसेना भाजपला सोडणार का? आ़ भारत भालके यांना उमेदवारी दिली तर आ़ प्रशांत परिचारक, शिवसेना महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे काय होणार? अशीही चर्चा झडत आहे.
राहिला प्रश्न तो आ़ प्रशांत परिचारक यांचा़ त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी द्यायची, गतवेळेला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक असतानाही आ़ प्रशांत परिचारक हे दीपक साळुंके यांना पराभूत करून विजयी झाले होते. आता तर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे़ त्यामुळे आ़ प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर सहजासहजी विजयी होतील.
शैला गोडसे या विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी वर्षभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला़ तेव्हापासून त्या मतदारसंघात प्रचार दौरा करीत आहेत़ मात्र त्यांना पदवीधर मतदारसंघ देऊन त्यांचीही अडसर दूर करायची, असे गृहित धरून आ. भारत भालके यांना भाजपमध्ये घेऊन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याची चर्चा दोन्ही तालुक्यात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लोकसभेला काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे़ आ़ भारत भालके यांच्या मतदारांशी थेट संपर्कामुळे शक्य झाल्याचे बोलले जाते़ त्यामुळे आ़ भारत भालके यांना भाजपमध्ये घेऊन ही जागाही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून भाजपला घ्यायची आणि आ़ भारत भालके यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव असल्याची चर्चा आहे़