नारदमुनी अवतरले पृथ्वीवरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:35 PM2019-10-18T12:35:21+5:302019-10-18T12:35:57+5:30

इंद्रदेवांच्या दरबारात पृथ्वीतलावरील निवडणुकीची एकच चर्चा सुरू आहे.

Nardamuni avtarlay Prithvi! | नारदमुनी अवतरले पृथ्वीवरी !

नारदमुनी अवतरले पृथ्वीवरी !

Next

विलास जळकोटकर

(इंद्रदेवांच्या दरबारात पृथ्वीतलावरील निवडणुकीची एकच चर्चा सुरू आहे. एवढ्यात आकाशभ्रमण करीत देवर्षी नारदमुनीचे आगमन होते.) 

  • नारदमुनी: नाराऽयणऽऽ नारायण... नाराऽऽयऽण
  • इंद्र: प्रणाम देवर्षी ! देवलोकी आपले त्रिवार स्वागत.
  • नारदमुनी: (दरबाराकडं पाहत) राजर्षी कसल्या विचारात बुडालात.
  • इंद्र: बरे झाले आलात, देवर्षी. पृथ्वीतलावर इलेक्शनमध्ये बरीच खळबळ चाललीय म्हणे... खोड्या, कुरघोड्यांना ऊत आलाय.
  • नारदमुनी: खरंय देवेंद्रा! ‘वरून भजन, आतून कीर्तन’ सुरूय. 
  • इंद्र: पण कशासाठी हा उपद्व्याप... जनतेला करू द्या की निर्भय मतदान...
  • नारदमुनी: राजर्षी, सत्ययुग गेलं... कलियुगात पैशासाठी सारं चाललंय. भगवंतनगरीत पार राडा चाललाय. अजून २ दिवसात तर काही खरं नाही.
  • इंद्र: देवर्षी, आपण त्रैलोकी भ्रमंती करता. पृथ्वीवरचे वर्तमान कळवाल. 
  • नारदमुनी: जशी आज्ञा राजर्षी हा निघालो... नाराऽयणऽऽ नाराऽयणऽऽऽ
  • (आकाशलोकी भ्रमण करत नारदमुनी पृथ्वीतलावर उतरतात. साधारण दुपारची वेळ... हॉटेलमध्ये तरुणांच्या इलेक्शनवर गप्पा सुरू आहेत. यातला एक कॉलेजकुमार असावा. नारदमुनी तेथेच थबकतात...) 
  • धोंड्या: कारं बाळू आज कॉलेजला बुट्टी मारली का?
  • बाळू: गावात इलेक्शनचा गोंधळ सुरू हाय. तिकडं काय आहे कॉलेजात.
  • धोंड्या: सालगडी राहून बापानं शेरात पाठविलंय तू बुट्टी मारतूच व्हय.
  • बाळू: लई शाणायच. तुजं ह्ये पुराण बंद कर नाह्यतर निघालो बग.
  • धोंड्या: बरं जाऊदी. काय म्हणतंय तिकडं शेरात परचार. हिकडं मेन मेन पुढाºयाचीच मजा हाय. 
  • बाळू: अरं, शहरात हायटेक प्रचार सुरू हाय. 
  • धोंड्या: काय म्हनला ! आयटीत परचार. अरं आयटीत परचार करायला आमीबी तयार हाय की, पण रिकाम्या पोटानं कसा करायचा ल्येका.
  • बाळू: धोंड्या खरंच तुजं डोकंबी ‘धोंड्या’सारखंच हाय ल्येका.
  • धोंड्या: का रं. काय झालं. चुकलं का? 
  • बाळू: हायटेक परचार म्हंजी उमेदवार मतदाराला त्येच्या मोबाईलवर मला मतदान द्या म्हणून मेसेज, नाहीतर ईमेल करतो.
  • धोंड्या: बाळ्या, तू काय बोलालायच त्ये कायबी कळंना बाबा. 
  • बाळू: तुज्या डोस्क्याच्या बाहेरचं हाय. तू जनावरं राखायचं काम कर.
  • धोंड्या: बरं जाऊ दी, मी काय म्हनतुया शेराचा परचार कसा चाललाय. 
  • बाळू: आता सोलापूरचं म्हनशील तर हितं शहर उत्तर, दक्षिण आन मध्य मध्ये चांगलीच फाईट हाय. मध्यात तर घासूनपुसून व्हनार म्हनत्यात. 
  • धोंड्या: आन् मव्हळात बाण लई उड्या मारायलाय म्हन.
  • बाळू: तिथं मालक येकीकडं आन् रथी-महारथी एकीकडं हाईत म्हन. 
  • धोंड्या: असंल बाबा, पण परत्यक्ष काय व्हईल देवाला ठाऊक. 
  • बाळू: अरं बार्शीत तर लई रान पेटलंय म्हन, करमाळ्यातबी मामा, आबा आन् दीदीमधी फाईट हाय म्हन. 
  • धोंड्या: हिकडं पंडपुरातबी नाना आन पंतामधी लई झंगडपकड चालू हाय 
  • बाळू: व्हय ऐकाय येतंय. त्या सांगोल्यात तर आबाचा नातू आन बापूमधी कुस्ती लागलीय.
  • धोंड्या: माढ्यातबी दादा आन संजूबाबात धुमशान सुरु हाय.
  • बाळू: समदीकडं असंच हाय. चल ल्येका आता लईभूक लागलीय. नाह्यतर किती येळ झाला म्हणून आमचं फादर वरडंल....
  • (एवढा वेळ थबकलेले नारदमुनी हे संभाषण ऐकून कपाळाला हात मारत. नाराऽऽयणऽऽ नारायणऽऽचा धावा करीत आकाशभ्रमणी निघतात.) 

Web Title: Nardamuni avtarlay Prithvi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.