राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचीही फसवणूक केली : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:26 PM2018-12-21T14:26:40+5:302018-12-21T14:28:33+5:30
सोलापूर : राफेलसंदर्भात काँग्रेसने सुरू केलेली लढाई आता थांबणार नाही, ती सुरूच राहील़ चुकीची माहिती आणि कॅगचा रिपोर्ट सादर ...
सोलापूर : राफेलसंदर्भात काँग्रेसने सुरू केलेली लढाई आता थांबणार नाही, ती सुरूच राहील़ चुकीची माहिती आणि कॅगचा रिपोर्ट सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचीही फसवणूक केल्याची टिका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केली.
दक्षिण सोलापूर पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमादरम्यान शिंदे बोलत होते. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी जनतेला फसविले, आता कॅगच्या अहवालाचा निर्वाळा देऊन त्यांनी सुप्रीम कोर्टाला चुकीची माहिती पुरवली. नोटाबंदीच्या काळात १२२ जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र आमचे अर्थमंत्री केवळ चार जण मृत्यू पावल्याची माहिती देत आहेत. ही दिशाभूल नाही का? असा सवाल करीत मोदी स्वत:ला हवे तसे यंत्रणेचा वापर करून घेत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
मुस्ती येथे मंजूर केलेला भारत फोर्जचा प्रकल्प पाण्याअभावी सुरू करता आला नाही. तेरामैल येथे उभारण्यात येणारा लोकशक्ती साखर कारखाना उभारण्यासाठी बँकांमार्फत मदत केली, पण अद्याप तो सुरू होऊ शकला नाही. बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी दिली. भूसंपादन केले, परंतु विमानतळ अद्याप सुरू होऊ शकले नाही, अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीकडे दुर्लक्ष करून होटगी रस्त्यावरील सोलापूर विमानतळावर २० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या ठिकाणी विमानाचे उड्डाण होत नाही, प्रवासी नाहीत, नाईट लँडिंगची सुविधा नाही, तरीही इतका खर्च का केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनाठायी खर्च करण्यात सरकारला धन्यता वाटत असावी, अशी टोलेबाजी शिंदे यांनी केली.