नरेंद्र मोदी यांची ९ जानेवारीला सोलापुरात सभा, जागेचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:00 PM2018-12-31T13:00:10+5:302018-12-31T13:01:22+5:30
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कोठे घ्यावी यावरून संयोजकांमध्ये पेच निर्माण झाला आहे. चार जागांची पाहणी ...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कोठे घ्यावी यावरून संयोजकांमध्ये पेच निर्माण झाला आहे. चार जागांची पाहणी करण्यात आली पण गर्दीच्या नियोजनासाठी प्रशस्त जागांचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून मोदी यांच्या दौºयाची सूचना मिळाल्यानंतर सोलापूरचे प्रभारी, खासदार अमर साबळे यांनी शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामधाम येथे नियोजनाबाबत प्राथमिक बैठक घेतली. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते. सभेचे ठिकाण निश्चित करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. इंदिरा गांधी स्टेडियमवर सभा घेतल्यास सुरक्षेच्या डी झोनमुळे जागा कमी पडेल, त्यामुळे मरिआई चौकातील मिलचे मैदान, जुळे सोलापुरातील मैदान आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळील मैदान अशा जागांबाबत चर्चा करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली जाहीर सभा सोलापुरात होणार असल्यामुळे सभेला गर्दीचे नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे जागा प्रशस्तच हवी असा आग्रह प्रत्येकांनी धरला. सभेसाठी व्यासपीठ, लोकांना बसण्यासाठी मोठी जागा आणि पार्किंग याबरोबरच सुरक्षेचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे शहरातील जागेचे नियोजन करताना पोलिसांची बाजू ऐकून घेण्याचे ठरले. गर्दीच्या नियोजनासाठी आणखी कुठे सभा घेता येईल याची चाचपणी करण्याचे ठरले असल्याचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी सांगितले.
महापौरांना डावलले
पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा जाहीर झाल्यावर प्रभारी सरोज पांडे यांनी नियोजनाच्या बैठका घेण्याबाबत कळविले. त्यानुसार पालकमंत्री देशमुख यांनी ही बैठक घेतली. पण बैठकीला महापौर बनशेट्टी यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.