नाकात नथ.. हातात स्टिक.. ओठाला लिपस्टिक सोलापूरच्या युवती वाजवितात ढम ढमा ढम ढोल
By Appasaheb.patil | Published: August 28, 2022 05:33 PM2022-08-28T17:33:07+5:302022-08-28T17:33:13+5:30
गल्लोगल्ली सराव : प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार पथक
सोलापूर : लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव उंबरठ्यावर असला तरी सोलापुरी युवतींचे ढोल वादन गेल्या पंधरवड्यापासून घुमू लागले आहे. जणू मिरवणूकच सुरू आहे, अशा उत्साहात उच्चशिक्षण घेत असलेल्या मुली नाकात नथ परिधान करून अन् हातात स्टीक घेऊन ढम ढमा ढम ढोल वाजवित आहेत.
मोजक्याच शाळांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या या वाद्याला २०१४ मध्ये पहिल्यांदा आजोबा गणपती मंदिर वाद्यवृंद ढोल पथकाने आपल्या साठ वादकांसह गणेशोत्सव मिरवणुकीत सामील केले. सोलापूरच्या रस्त्यांवर पंधरा ते वीस किलो वजनाचे भलेमोठे ढोल गळ्यात अडकवीत आपल्या पारंपरिक वेशात ढोल वाजवितांना पाहून सर्वजण भारावून गेले आणि तिथूनच सोलापुरी ढोल प्रकाशात आले. शहरात सध्या आजोबा गणपती, विश्व विनायक, शिवम ढोल, नीलकंटेश्वर, जुनी मिल यांसह जवळपास पन्नास ढोल पथके असून, त्यातून पाचशे ते सहाशे युवती वादन कला करीत आहेत. पाच वर्षांच्या हिंदवी गवसनेपासून ते पन्नास वर्षांच्या महिलांचा यामध्ये समावेश आहे.
- - गणेशोत्सवाच्या साठ दिवस आधीपासूनच वादकांना दररोज दोन तास सराव करावा लागतो. त्यानंतरच गणेशोत्सव मिरवणुकीत बारा ते चौदा तास ढोलवादन करणे शक्य होते.
- -नवीन शिकणाऱ्या युवतींची सुरुवातीला हात, पाय आणि पाठ दुखते. पुढे व्यायाम आणि सरावाने या वेदना कमी होतात. सात्त्विक आणि पौष्टिक आहाराची त्याला जोड द्यावी लागते.
- - ढोल पथकांचा सराव रात्री चालतो. सरावानंतर कित्येक मुली धीटपणे एकट्या घरी जातात. काही मुली पालकांसोबत जातात. मुलींमध्ये ढोल वाजविण्याची क्षमता मुलांपेक्षा जास्त असल्याने त्या थकत नाहीत.
------
डॉक्टर, वकील अन् आयटीच्या युवतीही वाजवितात ढोल
मेघा वनारोटे, संज्योया पाटील, पायल महाजन या उच्चशिक्षित डॉक्टरांसह आयटी क्षेत्रातील सौंदर्या पारशेट्टी, नेहा जोशी, वकिलीचा अभ्यास करणाऱ्या ईशानी पाटील, शिक्षिका असलेल्या श्रद्धा सकरगी, स्मिता गवसने, महाविद्यालयीन युवती वर्षिता दासर यांच्यासह अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतील युवतींही या वादनात सक्रिय सहभागी झाल्या असून, त्या मिरवणुकीत जल्लोषात वादनासह सहभागी होतात.
-------
सोलापुरी युवतींचे तेलंगणा, आंध्रात ढोलवादन सादर
घोंगडे वस्ती येथील शिवम ढोलपथक मागील पाच वर्षांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात जाऊन तेथील तेलगू गीतांवर सोलापुरी ढोलवादन सादर करीत असून, यंदा नऊ ते दहा दिवस ते आपली कला सादर करणार असल्याचे श्रीकांत झिट्टा यांनी सांगितले.
-------
नीलकंठेश्वर ढोल पथकांच्या युवतींचा जल्लोष
कुरहीनशेट्टी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे मुख्य आकर्षण होते ते ढोलवादन. या पथकातील युवती नेत्रा इराबत्ती आणि सुभद्रा बिज्जरगी यांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणाने हजारो उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी सर्वांनी एकच ठेका धरीत टाळ्यांच्या कडकडाटात कलेला दाद दिली.