राष्ट्रीय वरिष्ठगट तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा : ज्योतीका दत्ता, भवानी देवी यांना सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 07:46 PM2017-12-24T19:46:38+5:302017-12-24T19:46:38+5:30
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरु असलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलींच्या ई.पी . या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धेत हिमाचल प्रदेशची ज्योतीका दत्ता ...
सोलापूर - महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरु असलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलींच्या ई.पी . या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धेत हिमाचल प्रदेशची ज्योतीका दत्ता आणि मुलीच्याच सायबर या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धेत तामिळनाडूच्या भवानी देवी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करून सुवर्णपदक पटकावले.
ई.पी. प्रकारातील उपउपांत्य फेरीत कविता ( आसाम ) हिने चानू रंगला ( एस.एस.सी.बी सेनादल ) हीच १५ विरुद्ध ५ गुणाने पराभव केला. दुस-या सामन्यात तनिष्का ( हरियाणा ) हिने पंजाबच्या छवी कोहली हिच्यावर केवळ एका गुणाने मात केली. हा सामना शेवटपर्यंत अटीतटीचा रंगला होता अखेर तनिष्काने कोहली हिच्यावर मात केली. तीस-या सामन्यात चंदीगढच्या यशवंत कौर हिने मणिपूरच्या देवी रबीका हिच्यावर १५ विरुद्ध ११ गुणाने मात केली आणि सामना जिंकला. हिमाचल प्रदेशची ज्योतीका दत्ता आणि पंजाबच्या इना अरोरा यांच्यातील सामना ज्योतीक हिने १५ विरुद्ध १३ गुणाने जिंकला.
यातील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात देवी कविता (आसाम ) हिने तनिष्का हिच्यावर १५ विरुद्ध १२ गुणाने मात केली. तर दुस-या सामन्यात हिमाचलच्या ज्योतीका दत्ता हिने चंदीगढच्या यशरीत कौर हीचा १५ विरुद्ध १४ असा केवळ एका गुणाने पराभव करून अंतिम फेरी गाठली. हिमाचल प्रदेशची ज्योतीका दत्ता आणि आसामची देवी कविता यांच्यात अंतिम सामना होऊन ज्योतीका हिने कविता हीचा १५ विरुद्ध १३ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत ज्योतीका हिला सुवर्ण,आसामची देवी कविता हिला रौप्य आणि हरियाणाची तनिष्का व चंदीगढची यशरीत कौर यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या सायबर प्रकारातील उपउपांत्य सामन्यात जोश जोत्सना ( केरळ ) हिने पंजाबच्या जगजीत कौर हिच्यावर १५ विरुद्ध ९ अशी मात केली. दुस-या सामन्यात कोमलप्रीत शुक्ला-दुधारे ( पंजाब )हिने केरळच्या रिशा हीचा १५ विरुद्ध ७ गुणाने पराभव केला. मणिपूरची देवी डायना आणि छत्तीसगडची साम्या यांच्यातील तिसरा सामना रंगतदार झाला . शेवटपर्यंत सुरु असलेली अटीतटीची झुंज अखेर मणिपूरच्या डायना हिने १५ विरुद्ध १४ अशी जिंकली. चौथा सामना तामिळनाडूच्या भवानी देवी हिने एकतर्फी जिंकला. तिने तामिळनाडूच्याच संध्या करोलीन हिचा १५ विरुद्ध ३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
पहिला उपांत्य सामना जोश जोत्स्ना ( केरळ ) आणि कोमलप्रीत शुक्ला-दुधारे (पंजाब )यांच्यात होऊन ज्योत्सनाने १५ विरुद्ध १२ असा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या उपांत्य सामन्यात भवानी देवीने ( तामिळनाडू ) देवी डायना ( मणिपूर ) हिच्यावर १५ विरुद्ध १० अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या भवानी देवीने केरळच्या जोश ज्योत्सना हीचा १५ विरुद्ध १२ गुणाने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. केरळच्या जोश ज्योत्सना हिला रौप्य तर पंजाबची कोमलप्रीत शुक्ला - दुधारे आणि मणिपूरची देवी डायना यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.