पंढरपुरात ३४ फलाटांचे होणार नवीन चंद्रभागा बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 02:36 PM2019-03-06T14:36:00+5:302019-03-06T14:39:15+5:30
पंढरपूर : पंढरपूरच्या यात्राकाळात एस़ टी़ वाहक, चालकांची गैरसोय होत होती़ शिवाय वारकºयांच्या सोयीसाठी येथील चंद्रभागा मैदानात ३४ ...
पंढरपूर : पंढरपूरच्या यात्राकाळात एस़ टी़ वाहक, चालकांची गैरसोय होत होती़ शिवाय वारकºयांच्या सोयीसाठी येथील चंद्रभागा मैदानात ३४ फलाटांचे नवीन बसस्थानक आणि ५६८ एसटी कर्मचारी व ७३६ वारकºयांसाठी सुसज्ज असे यात्रीनिवास उभारण्यात येणार आहे़ त्याचा आराखडाही तयार झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या यात्रा सोहळा कालावधीत चंद्रभागा मैदानावर प्रत्येक वर्षी तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानक उभारण्यात येत असते. कायमस्वरुपी सोय व्हावी या उद्देशाने चंद्रभागा मैदानामध्ये बसस्थानक व यात्रीनिवासासह या प्रकल्पास महामंडळाच्या संचालक मंडळाने ३३ कोटी ९३ लाख ६३ हजार ६६० रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे़ शहरातील बसस्थानक अपुरे पडत असल्यामुळे चंद्रभागा मैदानाची २७.५० एकर जागा १९८८ सालापासून महामंडळाने संपादित केली आहे.
या जागेमधून आषाढी, कार्तिकी या यात्रा कालावधीसाठी वाहतूक केली जाते. दरवर्षी साधारण १२०० ते १५०० बस या जागेमध्ये यात्रा कालावधीमध्ये असतात. साधारणपणे ६० फूट बाय २० फूट आकाराच्या १० शेड्स तात्पुरत्या कालावधीसाठी उभारण्यात येतात. सर्व विभागांचे पर्यवेक्षक ते चालक, वाहक, कर्मचारी, यांत्रिकी कर्मचारी, सुरक्षा रक्षक व अधिकारी असे अंदाजे ५०० कर्मचारी वृंद त्याठिकाणी वास्तव्यास असतात.
यामुळे चंद्रभागा बसस्थानकाच्या जागेत कायमस्वरुपी बसस्थानक व यात्रीनिवास बांधण्याचे नियोजन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले होते. त्यानुसार आराखडा तयार करुन रविवारी चंद्रभागा मैदानाच्या जागेत यात्रीनिवासासह बसस्थानकाचे भूमिपूजन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले .
चालक, वाहकांबरोबर भाविकांचीही होणार सोय
- यात्रा कालावधीत एस.टी. बसचे हजारो चालक व वाहक येतात. काही जण तर विठ्ठलाची सेवा म्हणून ड्युटी मागून घेतात. पंढरपुरात त्यांना जेवण, राहण्याची सोय नसते. ते कुठेही राहतात, जेवतात. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिवहन महामंडळाच्या ताब्यात असलेले चंद्रभागा मैदान खूप मोठे आहे. त्याठिकाणी चालक व वाहकांची सोय करण्याची माझ्या मनात संकल्पना आली. मात्र त्याठिकाणी फक्त बसचालक व वाहकांसाठीच निवासाची सोय केल्यास, यात्रा वगळता त्याचा उपयोग होणार नाही. यामुळे चंद्रभागा बसस्थानकावर वारकºयांसाठी यात्रीनिवास व बसस्थानक उभारण्याबाबत हालचाली सुरु केल्या. यामुळे यात्रेसाठी आलेल्या बसचालक, वाहकांबरोबरच भाविकांना देखील त्याठिकाणी कमी पैशात राहण्याची, जेवणाची सोय होणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
असे असेल बसस्थानक
- चंद्रभागा मैदानामध्ये ३४ फलाटांचे नव्याने बसस्थानक उभारण्यात येणार आहे़ तसेच यात्रीनिवासामध्ये ५६८ कर्मचारी व ७३६ यात्रेकरूंसाठी तळमजला व पहिला मजला असलेली इमारत बांधण्यात येणार आहे़ यामध्ये सांडपाणी व पाणीपुरवठा व्यवस्था, भरावीकरण व डांबरीकरण, लँडस्कॅपिंग सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था, कुंपण भिंत आदी कामांचा समावेश असल्याचे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितले.