नवरात्रोत्सवात रूक्मिणीमातेला आकर्षक पोशाखात सजविण्यासाठी अलंकार गाठविण्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:08 PM2018-10-08T12:08:55+5:302018-10-08T12:11:04+5:30
मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी : रुक्मिणीमातेला असणार आकर्षक पोशाख
पंढरपूर : नवरात्रोत्सव दोनच दिवसांवर आला असून, या उत्सवात रुक्मिणीमातेला विविध रूपात सजविले जाते. त्यामुळे या सजावटीदरम्यान घालण्यात येणाºया पारंपरिक आकर्षक दागिन्यांची गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेली स्वच्छता व गाठविण्याचे काम रविवारी पूर्ण झाले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विठ्ठल- रुक्मिणीमातेला आकर्षक पोशाख घालण्यात येतो़ तसेच रोज विविध प्रकारची रुपे देऊन दागिनेही घालण्यात येतात. हे दागिने व्यवस्थित राहावेत, सुंदर दिसावे यासाठी नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी त्यांची स्वच्छता करून पुनर्गठित करण्याचे काम मंदिर समितीकडून प्रत्येक वर्षी केले जाते. विठ्ठलास घालण्यात येणाºया दागिन्यांमध्ये ४५ दागिन्यांचा सहभाग आहे.
यामध्ये लहान व मोठा लाफ्फा, कौस्तुभ मणी, बाजीराव कंठी, मोत्यांचा कंठा, मोर मंडोळी, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, बोरमाळ यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे.
तसेच रुक्मिणीमातेलादेखील ४५ ते ५० दागिने घालण्यात येतात. यामध्ये खड्याची वेणी, लहान-मोठा मणी, मोत्यांचे मंगळसूत्र, पाचोची गरसोळी, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, सोन्याचे गोठ, सोन्याचे पैंजण, मोत्याची बिंदी यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. हे सर्व दागिने गाठून घेण्याचे काम व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या समक्ष पटवेकरी व सोनार यांनी मंदिरात केले आहे.
रुक्मिणीमातेला प्रत्येक दिवशी असते वेगळे रुप
- नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस रुक्मिणीमातेला वेगळे रूप देण्याचे काम मंदिर समितीच्या पुजाºयांकडून होते. यामध्ये कमलादेवी, सरस्वती, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, पसरती बैठक, ललित पंचमी, कन्याकुमारी यासह अन्य रूपांचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व नित्योपचार विभागाचे प्रमुख अतुल बक्षी यांनी दिली.