उद्यापासून नवरात्रोत्सव; देवी मंदिरात रंगरंगोटी, मंडपाचीही उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:25 PM2019-09-28T12:25:41+5:302019-09-28T12:27:25+5:30
नवरात्रीची तयारी : भवानी मातेच्या आराधनेसाठी सोलापूरकर झाले सज्ज
सोलापूर : गणपती बाप्पाला नुकताच निरोप देण्यात आला़ आता देवीच्या आगमनासाठी राज्यासह सोलापूरकर सज्ज झाले आहेत़ नवरात्रीची तयारीही भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात येत आहे़ बहुसंख्य मंदिरांमधील रंगरंगोटीचे काम पूर्णत्त्वास आले आहे. शिवाय सार्वजनिक नवरात्र मंडळांनी चौकातील आपल्या पारंपरिक जागेवर मंडपांची उभारणी केल्याचेही दिसून आले.
शारदीय नवरात्रोत्सव येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या नऊ दिवसात देवीमातेची पूजा केली जाते. त्यासोबतच देवीच्या नऊ रूपांची उपासनाही या काळात केली जाते.
शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये पाहणी केली असता मंदिराचे सभागृह, बाहेरील भागाच्या रंगाचे काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. नवरात्र मंडळांनी दोन दिवसापूर्वीच मंडपाची उभारणी केली आहे. काही मंडळांचे मंडपाच्या छतावर पत्रे टाकणे आणि पडदे मारण्याचे काम सुरू केल्याचे निदर्शनास आले.
सोलापुरातील पहिले देवीचे मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळातही देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ यंदा या मंडळामध्ये नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ या मंंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे रथामध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि देवीची मिरवणूकही रथामधूनच काढण्यात येते.
देवीच्या स्वागतासाठी मंडप उभारण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे़ रोषणाईचे काम सुरू आहे. सोलापुरातील रूपाभवानी मंदिरामध्ये नवरात्र कालावधीमध्ये भक्तांची भरपूर गर्दी असते़ रूपाभवानी मंदिरामधील तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे़ मंदिरात रंग देण्याचे काम पूर्ण झाले आहे़ आज देवीच्या चांदीच्या चौथºयाला चकाकी देण्यात येणार आहे, तर माणिक चौक व्यापारी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यंदा मंडप सजवण्याचे काम सुरू आहे़ यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत़
आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव हे सोलापुरातील सर्वात जुने मंडळ म्हणून ओळखले जाते़ सोबतच सर्व जाती-धर्मातील लोक येऊन या देवीची पूजा करत असतात़ या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळाच्या वर्गणीसाठी फक्त एकच व्यक्ती असते़ तेच सर्वांकडून वर्गणी गोळा करतात. याचबरोबर यंदा नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़
- प्रशांत कणसे,
सचिव, आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळ
यंदा भक्तांसाठी मंडप
- नवरात्रीच्या कालावधीमध्ये रूपाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे दोनपासूनच रांगा लागलेल्या असतात. पण या काळामध्ये पावसाने जर हजेरी लावली तर भक्तांना मात्र भिजतच दर्शन घ्यावे लागते़ यामुळे यंदा मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे़ त्यावर ताडपत्री मारण्यात आली आहे़ यामुळे भक्तांना पाऊस लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे़ याचबरोबर दर्शन रांगांसाठी बॅरिकेड्सही लावले आहेत. देवीच्या आभूषणांना चकाकी देण्यासोबतच गाभाराही रंगविण्यात आला आहे़