बेताल वक्तव्य भोवले, भाजप आमदार राम कदमांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 04:02 PM2018-09-07T16:02:43+5:302018-09-07T16:07:11+5:30
भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस स्थानकात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलापूर - भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस स्थानकात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंदाकिनी काळे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राम कदम यांनी घाटकोप येथील दहीहंडी कार्यक्रमात बोलताना मुली पळवून आणू, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून तीव्र शब्दात त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सांगली येथे त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते. आयपीसीच्या कलम 504, 505 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करत महिलांचा अपमान केला. तसेच समाजातील महिलांची शांतता भंग होईल, असे कृत्य केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. बार्शी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या मंदाकिनी काळे यांनी याबाबत फिर्याद दिली. तसेच बार्शी शहरात आज राम कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांचे हे कृत्य थांबवले. बार्शीकरांनी एकत्र येत जुन्या गांधी पुतळ्याजवळ राम कदमच्या पुतळ्याला मिरवत निषेध नोंदविला. यावेळी मंदाताई काळे, अॅड राजश्री डमरे, माजी नगरसेविका शेळवणे, नगरपालिका विपक्ष पक्षनेते नागेश अक्कलकोटे, भूमाता ब्रिगेडचे विक्रांत पवार, मनसेचे विक्रम पवार, करुणा हिगंमिरे रिजवाना शेख प्रविण थळकरी जेष्ठ पञकार आप्पा पवार यांसह इतर बार्शीकरांनी राम कदम यांचा तीव्र निषेध नोंदवला.