"मी कुठेच नसलो तरी सगळीकडेच आहे"; शरद पवारांच्या गुगलीने भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 08:47 AM2023-11-17T08:47:13+5:302023-11-17T08:51:26+5:30
शेतकऱ्यांसाठी जे काम करतायेत त्यांच्यावर जर दबाव आणण्याचे काम कोणी करत असेल तर तो दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु, असा इशाराही पवार यांनी दिला.
कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : सध्या मी कुठेच नाही, पण तरीदेखील सगळीकडेच आहे. त्यामुळे ते प्रश्न कसे सोडवून घ्यायचे हे मला माहीत आहे, याची तुम्ही काळजी करू नका, अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी टाकली.
कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांच्या वतीने द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे गुरुवारी माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवार बाेलत होते. शेतकऱ्यांसाठी जे काम करतायेत त्यांच्यावर जर दबाव आणण्याचे काम कोणी करत असेल तर तो दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु, असा इशाराही पवार यांनी दिला.
पवार म्हणाले, हा दुष्काळी भाग आहे. मी जेव्हा या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्या काळातही दुष्काळ होता. त्यावेळी विविध कामे सुरू करून पाच लाख लोकांना दुष्काळी कामे दिली. त्यामुळे दुष्काळातून शेतकरी बाहेर आले होते. मी राज्याचा मुख्यमंत्री, नंतर केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतीविषयक भरपूर कामे केली. केंद्रीय कृषिमंत्री असताना ६७ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांचे पैसे ज्यांनी लाटले अशा सर्व लोकांची यादी द्या, त्या नेत्यांचा मी बंदोबस्त करतो आणि अशांना नेता म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.